बारा ते पंधरा वयोगतील मुलांचा विक्रीसाठी वापर; यंत्रणेचे दुर्लक्ष, सुरक्षा अंधारात

मुंबईत दर पंधरा दिवसांत आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल अत्याधुनिक उपकरणे आयात करत असताना गेल्या आठवडय़ाभरापासून मरिन ड्राईव्हवर आकाशात प्रकाशझोत सोडणाऱ्या धोक्यादायक दिव्यांची सर्रास विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे या कामात बारा ते पंधरा वर्षांच्या मुलाचा उपयोग केला जात आहे. यात केवळ ‘बाल’ हट्ट पुरवण्यासाठी काही मंडळी एका वेळेस चार ते पाच दिवे रोज आकाशात सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सुरक्षा यंत्रणाही दुर्लक्ष करत असल्याने सुरक्षा अंधारात असल्याची टीका रहिवाशी करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शहरात मकर संक्रांत, नाताळ, नवे वर्ष, वाढदिवस, लग्नांचा वाढदिवस, कंपनीचा व्यावसायिक कार्यक्रम आदींचे औचित्यसाधून आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे सोडले जात आहेत. आतापर्यंत या दिव्यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आल्याने काही मंडळी ऑनलाइन पद्धतीने दिव्याच्या खरेदी करत असत. आता मात्र थेट हे दिवे चौपाटीवर विकले जात आहेत. ८० रुपयांपासून ते अगदी २०० रुपयांपर्यंत आकारानुसार या दिव्यांची विक्री केली जात आहे. यात धोकादायक म्हणजे या दिव्यांसाठी  मरिन ड्राईव्हच्या समुद्र किनारी छोटय़ा छोटय़ा आग पेटवल्या जात आहे. हा साराप्रकार सर्रासपणे होत असताना त्याकडे सुरक्षा यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याच्या तRारी इथले रहिवासी करत आहेत.

समुद्र किनारी जाऊन हे दिवे आकाशात सोडले जात आहेत. त्यामुळे आकाशात प्रदुषण होण्यासह हवाई दलाच्या विमानांना धोका उत्पन्न होण्याकडे लोक दुर्लक्ष करत असल्याचे निरिक्षण तज्ज्ञमंडळी नोंदवत आहेत. याशिवाय आकाशात अशा प्रकारचे दिवे सोडण्याची परंपरा ब्राझिल आणि पोर्तुगालमधून आपल्याकडे आली आहे. तिथे जून महिन्याच्या सुट्टीत मोकळ्या मैदानांतून हे दिवे सोडले जातात. मात्र त्यांची भौगोलिक रचना आणि मुंबईची रचना यात फरक आहे. आपल्याकडे इमारतींची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लोकांनी लक्षात घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

काही महिन्यांपूर्वीच मालाडच्या एका इमारतीला आकाशात सोडण्याय आलेल्या एका दिव्यामुळे संपूर्ण माळ्यावर आग पसरली होती. सुदैवाने या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्यात लोक राहात नव्हते. मात्र ही आग विजवण्यसाठी अग्निशमन दलाला पाच तासांचा कालावधी लागला होता. त्यामुळे लोकांनी अशा दिव्यांची खरेदी सुद्ध करू नये असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी केले आहे. याशिवाय यावर बंदी आणण्यासाठी मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. तरीही अशा प्रकारे विक्री होत असेल दिवे विक्री करणारे आणि विकत घेणारे यांच्यावर कारवाई केली जाईल असे रहांगदळे म्हणाले.

काय होऊ  शकते?

रात्रीच्या वेळी हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर सराव करण्यासाठी काही अंतर खाली येतात. या वेळी प्रखर प्रकाशझोतामुळे त्यांना अडचणी निर्माण होऊ  शकतात.

या दिव्यांचा विद्युत तारेशी संपर्क येऊन नुकसान होऊ  शकते.

उतुंग इमारतीच्या वातानुकूलन यंत्रांशी संपर्क झाल्यास आग लागू शकते.

बांधकाम इमारतींवर लाकूड आणि प्लास्टिकचा वापर केला जातो. अशा ठिकाणी आग लागू शकते.

प्रामुख्याने घुबडे आणि वटवाघुळे यांना त्रास होऊ  शकतो.