20 February 2019

News Flash

तलाव अजूनही तहानलेले

तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावण्याची गरज आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असले तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या चार धरणक्षेत्रांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. या तलावांमध्ये उपलब्ध असलेला एकत्रित पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने पालिकेच्या जलविभागातील अधिकारी चिंतेत आहेत.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधून दर दिवशी ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे सोमवारी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला. विहार तलावही ओसंडून वाहण्याच्या बेतात आहे. मात्र अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसामध्ये पावसाच्या तुरळक हजेरीने पालिकेच्या जल विभागातील अधिकारी चिंतेत पडले आहेत. सोमवारी दिवसभरात अप्पर वैतरणामध्ये १२ मि.मी., मोडकसागरमध्ये २७ मि.मी., तानसामध्ये १७ मि.मी., मध्य वैतरणामध्ये ९ मि.मी., तर भातसामध्ये १० मि.मी. पावसाची नोंद झाली.

या सातही तलावांमध्ये सध्या पाच लाख ६४ हजार ५६५ दशलक्ष लिटर पाणीसाठा असून तलावातील वापरायोग्य पाण्याच्या तुलनेत तो ३९.०१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात तलावांमध्ये सहा लाख ८७ हजार ५११ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. मुंबईकरांना वर्षभर सुरळीतपणे पाणीपुरवठा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी सातही तलावांमध्ये १४.५ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावण्याची गरज आहे.

निम्म्याहून अधिक जुलै महिना संपायचा आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पाऊस पडेल. त्यामुळे सप्टेंबरअखेरीपर्यंत समाधानकारक पाऊस पडून तलावात आवश्यक तेवढा जलसाठा उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागातील अभियंते व्यक्त करीत आहेत; परंतु हे पावसाच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on July 12, 2018 1:36 am

Web Title: light rain fall in lakes supplying water to mumbai