पुढील दोन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता
पुणे, नाशिकला गारव्याची सुरुवात झाली असली तरी मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील दिवाळी या वर्षीही गरमागरमच साजरी होईल. सकाळच्या वेळेस येणारे वारे ईशान्येकडून येत असले तरी त्यांच्यापेक्षा समुद्रावरील वाऱ्यांचा प्रभाव अधिक असल्याने किनारपट्टीवरील किमान तापमान २० अंश से.पेक्षा खाली येण्याची शक्यता नाही. त्याच वेळी अरबी समुद्रात दक्षिणेकडे वादळसदृश स्थिती व मध्य प्रदेशवरील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
भारताच्या उत्तरेकडे थंडीने पंधरवडय़ापूर्वीच प्रवेश केला. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याच वेळेला राज्यातील वाऱ्यांनीही दिशा बदलली असून ईशान्येकडून येणारे वारे प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे पुणे, नाशिकमध्ये गारवा सुरू झाला असून सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये नोंदवले गेले. राज्याच्या अंतर्गत भागात गारव्याने चंचुप्रवेश केला असला तरी गेल्या काही वर्षांतील नोंद व या वेळची हवामानाची स्थिती पाहता दिवाळीत मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील तापमान कमी होण्याची शक्यता mum012नाही. गेल्या पाच वर्षांत दिवाळीतील अभ्यंगस्नानाच्या दिवशी मुंबईतील किमान तापमान २१ अंश से.हून अधिकच राहिले आहे.
सध्या ईशान्य मोसमी वारे वाहत असून मुंबईतही रात्रीच्या वेळी ईशान्य दिशेने वारे येतात. या वाऱ्यांमुळे राज्याच्या अंतर्गत भागातील तापमान कमी होत असले तरी किनारपट्टीवर समुद्राचा प्रभाव अधिक असल्याने तापमानात अजूनही घट होताना दिसत नाहीत. पुढील आठवडाभर तरी वाऱ्यांची दिशा बदलण्याची फारशी शक्यता नाही, त्यामुळे तापमानात फारसे चढउतारही होणार नाहीत, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.
दिवाळी पुन्हा एकदा गरमागरम होण्याची शक्यता असतानाच पुढील दोन ते चार दिवस राज्याच्या बहुतांश भागांत पावसाच्या तुरळक सरी येण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवडय़ात अरबी समुद्रात निर्माण झालेले चोपाल वादळ येमेनच्या किनाऱ्यावर धडकत असतानाच आणखी एका वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. या स्थितीतून वादळ निर्माण झाल्यास त्याचा भारतीय किनारपट्टीला फटका बसणार नाही. मात्र या बदलामुळे तसेच मध्य प्रदेशच्या दक्षिणेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही एक किंवा दोन दिवस तुरळक सरी येण्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे.