समारंभांतील लेझर दिवे आणि रोषणाईविरोधात वैमानिकांच्या तक्रारींमध्ये वाढ

देशातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैमानिकांना विमानाचे उड्डाण करताना किंवा उतरवताना विमानतळ परिसरातून येणाऱ्या लेझर दिव्यांचा अडथळा जाणवत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांमधून वैमानिकांकडून अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे विमानतळ प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत अशा प्रकारच्या २४ तक्रारी आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विमानाच्या उड्डाणाच्या वेळेस किंवा विमान उतरवित असताना वैमानिकांना विविध प्रकारचे अडथळे येतात. यामध्ये कधीकधी मार्गात ड्रोन येते तर कधी गरम हवेचे फुगे येतात, पतंग, फटके अशा प्रकारच्या अडचणी असतात. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून लेझर दिव्यांचा समावेश झाला आहे. विमानतळालगतची झोपडपट्टी आणि या परिसरातील मोकळय़ा जागांवर साजरे होणारे सण किंवा लग्न समारंभ यादरम्यान प्रखर लेझर दिव्यांचा वापर केला जातो. या दिव्यांचा अडथळा विमानाच्या वाहतूकीसाठी येत असल्याचे २४ तक्रारी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वैमानिकांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केल्या आहेत. या तक्रारीचे  प्रमाण २०१६मध्ये १५ इतके होते तर २०१५ मध्ये २४ इतके होते. यासंदर्भात प्राधिकरण वेळोवेळी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून दिव्यांचा प्रकाश कमी करण्याची विनंती करते. त्यानुसार कार्यवाही होते. पण यावर अद्याप कोणताही कायमस्वरुपी तोडगा निघाला नसल्याचेही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्व द्रूतगती मार्गावरील मोकळय़ा मैदानावर नियमित लग्न कार्ये सुरू असतात. यामुळे या परिसरात ही अडचण नेहमीच जाणवत असते. प्राधिकरण यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

तासाला ५० विमाने

मुंबई विमानतळावर असलेल्या धावपट्टीवर सुमारे ५० सेकंदाला एक विमान उड्डाण करते आणि एक उतरते. हा वेळ कधी कधी कमीही होते. यामुळे तासाला ५० विमानांची वाहतूक करणारे हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ ठरले आहे. या विमानतळाची जागा देशातील इतर महत्त्वाच्या विमान तळाच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी विमानातळावरील प्रवाशांची संख्या ही सुमारे साडे चार कोटी इतकी आहे.

अत्याधुनिक सुविधा

विमानतळाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी विमानतळावर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विमान धावपट्टीवरून कमीत कमी वेळात जोड रस्त्यावर यावे यासाठी धावपट्टी लगत दोन विशेष जोड रस्ते बांधण्ययात आले आहेत. यामुळे विमान कमीत कमी वेळ धावपट्टीवर असणार आहे. धावपट्टीवर आणखी अत्याधुनिक यंत्रणा बसवून त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल याबाबत यासाठी प्राधिकरणातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.