अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. दरम्यान, अटलजींप्रती आदरभाव व्यक्त करताना नेहमी झगमगाटाने उजळून निघणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची अर्थात सीएसएमटीची इमारतही गुरुवारी दिवे मालवून शांत ठेवण्यात आली होती.


अवघ्या मुंबईची शान आणि ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या सीएसएमटीच्या इमारतीवरचा झगमगाट बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात आपल्या वेगळ्याच सौंदर्याने खुलून दिसणारी ही इमारत गुरुवारी निस्तेज झाली होती.

दरम्यान, अटलजींच्या जाण्यामुळे केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर फडकावण्यात येणार आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर दिल्लीतील राजघाट परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.