28 September 2020

News Flash

बाजारपेठांवर पावसाचे निर्बंध

मॉलचा पहिला दिवस पावसाचा; दुकाने सज्ज,मर्यादित ग्राहक

मॉलचा पहिला दिवस पावसाचा; दुकाने सज्ज,मर्यादित ग्राहक

मुंबई : साडेचार महिन्यांनंतर अखेरीस बुधवारी मॉलचा झगमगाट पुन्हा नव्याने सुरू झाला. मॉलमधील सर्व दुकाने पूर्ववत चकाचक होऊन सज्ज झाली, पण सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पहिला दिवस मर्यादित ग्राहकांनीच ‘मॉल आनंद’ घेतला.

गेल्या काही वर्षांत विरंगुळा, खरेदी, खाद्यभ्रमंती, मनोरंजन, लहान मुलांसाठी खेळण्याचे पर्याय असे बहुविध रूपे असलेली मॉल संस्कृती मुंबईत रुजली आहे. आबालवृद्धांपासून सर्वानाचा याचे आकर्षण. करोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून बंद झालेले शहर आणि उपनगरातील मॉल अखेरीस अनेक निर्बंधांसहित बुधवारी खुले झाले.

मॉलच्या प्रवेशद्वारावरच अ‍ॅपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा, आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे पडताळणी आणि निर्जंतुकीकरणाचे उपाय अशा बंदोबस्तात ग्राहकांना प्रवेश देण्यात आला. पूर्वनोंदणी नसेल तर तेथेच अ‍ॅप अथवा फेसबुकद्वारे नोंदणी करावी लागली.

मॉल खुली करताना सध्या खाद्यपानगृहे, चित्रपटगृहे, मुलांसाठी व मोठय़ांसाठीची मनोरंजन केंद्रे बंद ठेवण्याची अट आहे. त्यामुळे उर्वरित दुकानांमध्ये बहुतांशपणे जीवनशैलीशी (लाइफस्टाइल) निगडित दुकानांचाच समावेश अधिक आहे. मात्र सर्वच दुकानांनी पहिल्या दिवशीच व्यवसायास सुरुवात केली नाही. अनेक ठिकाणी मॉल व्यवस्थापनाच्या नियमावलीनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच दुकान सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. घाटकोपरच्या आर सिटी मॉलमध्ये पहिल्या दिवशी १८० पैकी ७५ दुकाने, तर लोअर परळ येथील फिनिक्स मिल मॉलमध्ये २६५ पैकी २१० दुकाने सुरू झाली. मात्र आठवडाअखेरी शासकीय नियमानुसार परवानगी असलेली सर्व दुकाने सुरू  होतील अशी आशा मॉल व्यवस्थापन व्यक्त करत आहे.

अनेक ठिकाणी सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि विस्कळीत झालेली वाहतूक यामुळे बहुतांश मॉलमध्ये दुपापर्यंत सुमारे २०० च्या आसपासच ग्राहक आले. पण पुढील पंधरवडय़ात ही संख्या वाढण्याची मॉल व्यवस्थापनास अपेक्षा आहे.

‘मॉलमध्ये खरेदीबरोबरच अनेक लकी ड्रॉसारखे छोटेमोठे इव्हेंट होत असतात. मात्र सध्या गर्दी जमविण्यावर निर्बंध असल्याने असे इव्हेंट यापुढे ऑनलाइन माध्यमातून करण्यात येतील असे,’ आर सिटी मॉलचे मुख्य संतुश कुमार पांडे यांनी सांगितले. तसेच मॉलमधील दुकानदारांनादेखील ऑनलाइन माध्यमातून विविध योजना आणि विक्री करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचे पांडे यांनी नमूद केले.

‘इतर राज्यांतील शहरात मॉलना सुरुवातीला ३० ते ४० टक्के प्रतिसाद मिळाला. मुंबईत तुलनेने कमी कालावधीत प्रतिसाद वाढण्याची शक्यता असल्याचे, फिनिक्स मिल मॉलचे अध्यक्ष राजेंद्र कालकर यांनी सांगितले.

सध्या मॉल सुरू ठेवण्याची वेळ खरेदीच्या दृष्टीने फारशी पूरक नाही, मात्र वेळ वाढवून देण्याबाबत लगेचच मागणी केली जाणार नसल्याचे अनेक मॉल व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. सध्याची यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत होत आहे हे सिद्ध झाल्यावरच पुढील टप्प्यात जाण्याचा विचार असल्याचे संतुश कुमार पांडे यांनी सांगितले.

ग्राहक कोणत्या दुकानात?

बहुतांश ग्राहक हे कोणत्या दुकानात जायचे आहे हे ठरवूनच येत होते. कपडय़ांच्या दुकानात तुलनेने सर्वात कमी ग्राहक दिसून आले. कपडे घालून पाहण्याची सुविधा (ट्रायल रूम) नसल्याने अगदी ठरवूनच एखादा कपडा घेणारे तुरळक होते. घडय़ाळ, मोबाइलच्या दुकानात हमखास ग्राहक दिसून आले. क्रीडा व साहसी क्रीडा प्रकारातील साधने, कपडे विकणाऱ्या डेकॅथ्लॉनच्या दुकानात बऱ्यापैकी वर्दळ दिसली.

तिसरा मजला बंदच

बहुतांश बहुमजली मॉलमध्ये तिसरा मजला हा खाद्यपानगृह, चित्रपटगृह आणि लहान मुलांसाठीचे मनोरंजन केंद्र यासाठी असतो. सध्या यास पूर्णत: बंदी असल्याने अनेक मॉलमधील तिसरा मजला पूर्णपणे बंद ठेवला. तर मुलुंडच्या आर मॉलमधील बिग बझारमध्ये  गर्दी होऊ नये यासाठी बंद ठेवण्यात आला.

दुकानदारांनाही प्रतीक्षा

मुंबई : एक दिवसआड दुकान बंद ठेवण्याच्या जाचातून दुकानदारांची बुधवारपासून सुटका झाली असली तरी पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने मुंबईतील बाजारपेठा म्हणाव्या तशा बहरल्याच नाहीत.

सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्राहक दुकानांमध्ये फारसा फिरकलाच नाही. तर काही दुकानदारांनीही पावसामुळे दुकाने  बंद ठेवली होती. अर्थात पाऊस कमी झाला की व्यवसायाला गती मिळेल असा आशावाद दुकानदार बाळगत आहेत.

बुधवारपासून नियमित दुकाने सुरू झाली, पण पावसाने त्यात खो घातला. नियमित दुकान सुरू ठेवण्याचे आदेश मिळाल्याने आनंद झाला. पण पावसामुळे फारसा व्यवसाय झाला नाही,’ असे दादर येथील अलका वस्त्रालयचे व्यवस्थापक नीलेश खडपे यांनी सांगितले.

पावसामुळे धारावीतील लेदर बाजारातही शुकशुकाट होता. लालबाग परिसरात पाऊस अधिक असल्याने अर्ध्याहून अधिक दुकाने दुपारनंतर बंद झाली. ‘नियमित दुकान सुरू झाली. पण ग्राहक यायला हवे. बाजारासाठी येणारा ग्राहक हा केवळ एकाच विभागातून येत नाही. लोकल सुरू झाल्याशिवाय व्यवसायाला गती मिळणे कठीण आहे,’ अशी प्रतिक्रिया लालबाग येथील महावीर कलेक्शनचे राकेश जैन यांनी दिली.

यालाच पुस्ती जोडत अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील शैक्षणिक साहित्य विक्रेते सांगतात, ‘मस्जिद बंदर परिसरात घाऊक बाजार आहे. येथे येणारा ग्राहक हा मुंबईबाहेरचा आहे. त्यामुळे प्रवास सुरळीत झाला तर व्यवसाय सुरळीत होईल.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:35 am

Web Title: limited customers in mall due to heavy rain on the first day of reopening zws 70
Next Stories
1 मासेखरेदीला निर्यातदार अनुकूल
2 वाढीव वीजदेयकात सवलतीस नकार
3 दक्षिण मुंबईत अतिवृष्टी
Just Now!
X