सांताक्रुझ येथे अपघातात मरण पावलेल्या लिना रिबेरो या महिलेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी संशय उपस्थित केला आहे. या प्रकरणातील अनेक प्रश्न गूढ निर्माण करणारे असून पोलीस हे प्रकरण दडपत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. २७ एप्रिल रोजी लिना यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
लिना रिबेलो (५३) या कुर्ला येथे दोन मुलींसह राहत होत्या. रविवार २७ एप्रिल रोजी त्या अंधेरीच्या चर्च मध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून साडेदहा वाजता त्या कुर्ला येथील घरी जाण्यासाठी रिक्षाहून निघाल्या होत्या. मात्र रात्री सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ उड्डाणपूलाच्या अलिकडे त्यांचा मृतदेह सापडला होता.
अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचे वाकोला पोलिसांनी सांगितले. परंतु या अपघाताबाबत अनेक प्रश्न रिबेरो यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत. त्या कुर्ला येथे रहात होत्या मग अंधेरीच्या दिशेने का गेल्या असा त्यांचा सवाल आहे. घटना घडली तेव्हा अनेक लोक जमा झाले होते. पण पोलिसांनी या घटनेचा एकही साक्षीदार नसल्याचे सांगितले, असे कुटुंबियांनी म्हटले आहे.
वाकोला पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हा केवळ एक अपघात होता आणि तरी आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत असे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मुळ्ये यांनी सांगितले.

हे प्रश्न अनुत्तरीतच..
माझी बहिण कुर्ला येथे राहत असताना विरुद्ध दिशेला जाईलच का? घटनेच्या वेळी दोन महिला माझ्या बहिणीसोबत होत्या अशी माहिती आम्हाला स्थानिकांनी दिली होती. त्या दोन महिला कोण होत्या ? अंधेरीहून त्या रिक्षाने निघाल्या होत्या मग येथे त्या पायी कशा चालत आल्या, अशा अनेक प्रश्नांकडे मयत रिबेरो यांची बहिण जेसिंथा मिलर यांनी लक्ष वेधले. पोलीस हे प्रकरण का दडपू पाहत आहेत, असा सवालही त्यांनी केला.