शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात एकीकडे विज्ञान आणि गणित विषयाचे महत्त्व प्रचंड वाढत असताना भाषाविषय मात्र दुर्लक्षित राहात आहेत. भाषेतल्या गमतीजमती, त्यातले खेळ या गोष्टींपासून नव्या पिढीतील मुले अनभिज्ञ आहेत. अशा मुलांना समृद्ध भाषाक्षेत्राची ओळख करून देणारे ‘भाषाविश्व’ प्रदर्शन विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयात ४ व ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले.

प्रदर्शनातील पहिल्याच दालनात भाषेच्या उत्त्पत्तीची गोष्ट आदिवासी वेशातील विद्यार्थ्यांनी सांगितली. अश्मयुगीन काळात जंगलात

राहणारा माणूस प्राणी-पक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत असे. यातूनच भाषेची उत्त्पत्ती झाली. गुहांमध्ये कोरलेल्या चित्रांतूनही माणूस व्यक्त होत असे. याचा प्रत्यक्ष अनुभव देणारा देखावा तयार करण्यात आला होता.

‘विद्यार्थी कायम अभ्यासात अडकलेले असतात. मात्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने पार्ले टिळक संस्थेच्या नऊ शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम केले. यानिमित्ताने आलेल्या लोकांशी कसा संवाद साधावा हे विद्यार्थी शिक ले. खेळांच्या दालनात मुले विशेष रमली. पाठांतरापेक्षाही खेळाच्या माध्यमातून मुलांना अधिक चांगले शिक्षण मिळते. एक प्रदर्शन संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीचे नियोजन आम्ही सुरू करतो’, असे पार्ले टिळक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना त्रलोक्य यांनी सांगितले.