जयेश शिरसाट

मद्यविक्रीवरील विचित्र वेळमर्यादेमुळे मुंबईसह आसपासच्या महानगरांमधील मद्यालय चालक-मालक नाराज आहेत.

शासनाने ‘पुन्हा सुरुवात’ उपक्रमांतर्गत हॉटेल, मद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी संध्याकाळी सातनंतर मद्यविक्रीस बंदी घातली आहे. या निर्बंधामुळे मद्यालये सुरूच का करावीत, अशी भूमिका घेत बहुसंख्य चालकांनी मद्यालये सुरू केली नाहीत.

हे निर्बंध राज्य उत्पादन शुल्क विभागाने लादलेले नाहीत, असे स्पष्ट करत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्यातील विविध शहरांमधील वेळमर्यादा भिन्न असल्याची माहिती दिली. नागपूर येथे रात्री नऊ तर पुणे येथे रात्री दहानंतर मद्यविक्री करता येणार नाही, असे आदेश असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या माहितीस दुजोरा दिला. मद्यालय चालक-मालकांमधील अस्वस्थता पर्यटन विभागाला कळवून वेळमर्यादेबाबत सुसूत्रता आणणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवल्याचे उमाप यांनी सांगितले.

दुपारी किंवा संध्याकाळी सातच्या आत मद्यासह भोजनाचा आस्वाद घेण्याचा पायंडा देशात कु ठेच अद्याप रुळलेला नाही. काम आटोपून रात्री आठनंतर मित्रपरिवारासह, कुटुंबासह ग्राहकवर्ग मद्यालयांमध्ये अवतरतो. रात्री नऊ-दहा दरम्यान ग्राहकांची संख्या सर्वाधिक असते. अकरानंतर हळूहळू गर्दी ओसरते. शासनाने वेळेचे बंधन घातले खरे पण ते ग्राहकांना रूचणार आहे का? सातपर्यंतच मद्य मिळणार म्हणून ग्राहक कामधंदा सोडून मद्यालयांत येणार आहे का? असे प्रश्न नवी मुंबई, ठाण्यातील व्यावसायिक दयानंद शेट्टी यांनी के ला. व्यवसाय सुरू होणार म्हणून कर्मचारी वर्गाला विमानाने बोलावून घेतले. वेळ नव्हता पण मद्यालयाची डागडुजी, आसनव्यवस्था करून घेतली. हा सर्व खर्च आणि खटाटोप वाया जाण्याची चिन्हे आहेत, अशी तक्रोरही त्यांनी केली.

वेळमर्यादेच्या पुनर्विचाराची मागणी

मद्यालयांमध्ये रात्री साडेबारापर्यंत जेवण देण्याची मुभा आहे. मात्र मद्यविक्री संध्याकाळी सातनंतर बंद करावी, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी दिल्या आहेत. या बंधनामुळे मद्यालयांमध्ये ग्राहक फिरकणार नाहीत. मुळात अन्नपदार्थासाठी ग्राहक मद्यालयांमध्ये येत नाहीत. त्यासाठी त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत. संध्याकाळी सातनंतर मद्य मिळणार नसेल तर मद्यालये ओस पडणार यात शंका नाही. शासनाने या बंधनाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती आहार या हॉटेल मालकांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी केली.