दारूविक्रीतील घट ८ ते १२वरून २५ टक्क्यांवर

सण व उत्सवाच्या काळात मुंबईकर मांसाहाराबरोबरच मद्यप्राशनावरही कसा ताबा ठेवतात याचे प्रत्यंतर दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या काळात मद्याच्या घटलेल्या विक्रीवरून येते. परंतु यंदा या दोन्ही महिन्यात शनिवार-रविवारला लागून आलेल्या सुट्टय़ांमुळे मोठय़ा संख्येने मुंबईकर शहराबाहेर पर्यटनासाठी बाहेर पडले. नेमकी हीच बाब दारूच्या विक्रीवर मोठा परिणाम करणारी ठरली आहे. एरवी ऑगस्ट-सप्टेंबर काळात दारूविक्रीत ८ ते १२ टक्के घट होते. परंतु, यंदा मुंबईकर सुट्टय़ांचा फायदा घेत सतत पर्यटनासाठी बाहेर जात राहिल्याने हे प्रमाण तब्बल २५ टक्के वाढल्याने यंदाचा चातुर्मास दारूविक्रेत्यांकरिता अतिकडक ठरला आहे.

mv03
मुंबई व उपनगर जिल्ह्यात यंदाच्या जून व जुलै महिन्यातील दारूच्या खपाच्या तुलनेत ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील खप ३६ लाख लिटरनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही महिन्यात धार्मिक सोहळे व सण होते. पण, लागून आलेल्या सुट्टय़ांच्या काळात मुंबईकरांनी शहरातून काढता पाय घेतल्यानेही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी खप झाल्याचे मद्यविक्रेत्यांनी सांगितले.

मुंबईत दररोज झडणाऱ्या पाटर्य़ा पाहता मद्याचा खप हा काही लाख लिटरवर असतो. हा दारूचा खप दरवर्षी श्रावणादी सात्विक महिन्यात घटलेलाही दिसतो. मात्र, यंदा हा खप जादा घटल्याचे सरकारी आकडेवारी व मद्य विक्रेत्यांच्या कथनावरून दिसून येत आहे. यंदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांपैकी ऑगस्ट महिन्यात पूर्ण श्रावण आणि सप्टेंबर महिन्यात गणपती, पितृ पंधरवडा आल्याने जवळपास पावणे दोन महिने अध्यात्म वगैरे पाळणाऱ्या ‘तळीरामांना’ अघोषित ‘ड्राय-डे’ सहन करावा लागला. यातच मद्य विक्रेत्यांसाठी हा महिना दुष्काळात तेरावा महिना ठरला. कारण, या पावणे दोन महिन्यांत अनेक सार्वजनिक सुट्टय़ा या गुरुवार, शुक्रवार किंवा सोमवार अशा शनिवार आणि रविवार या दिवसांना लागून आल्या.

त्यामुळे अनेक मुंबईकरांनी मुंबई बाहेर ठाणे, रायगड या भागात सुट्टय़ा घालवण्यासाठी धाव घेतली  होती. त्यामुळे याचा परिणाम मुंबईतील दारूच्या विक्रीवर होऊन त्यात अजून घट झाली.

अनेक जण या सणासुदीच्या दिवसांत  अन्य भागात सुट्टी घालवण्यासाठी गेल्याने मुंबईतील खपावर विपरीत परिणाम झाला. उलट या काळात रायगड येथील खपात वाढ झाल्याचेही दिसले, अशी माहिती ‘शहा आणि शहा वाईन्स’चे रनदीप शहा यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीतही जून व जुलै या सामान्य महिन्यांपेक्षा ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात मात्र मद्याच्या विक्रीतही ३६ लाख लीटरची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. ‘मद्य शौकिनांच्या  ओल्या पाटर्य़ा पर्यटनाच्या ठिकाणीही सुरूच राहतात. त्यामुळे, मुंबईकर शहरातून बाहेर पडून ज्या भागात पर्यटनासाठी गेले तिथला मद्याचा खप काहीसा वाढला,’ असे शहा यांनी सांगितले.