रेल्वेमंत्री पीयूष गोयल व रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत पाठपुरावा केल्यावर राज्य सरकारच्या यंत्रणेने सोमवारसाठी ४६ आणि पुढील काळासाठी १५७ विशेष रेल्वेगाडय़ांसाठी प्रवाशांच्या याद्या व आवश्यक तपशील रेल्वे प्रशासनास सादर केला. या मुद्दय़ावर दोन्ही यंत्रणांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले.

रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाडय़ा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देत नाही, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तात्काळ दखल घेत सोमवारसाठी १२५ तर त्यानंतर हव्या तितक्या गाडय़ा देण्याची घोषणा केली. गाडय़ा कोणत्या स्थानकापासून कोणत्या राज्यासाठी व कोणत्या स्थानकापर्यंत हव्या आहेत, प्रवाशांची यादी व अन्य तपशील तासाभरात रेल्वे प्रशासनास देण्याची विनंती गोयल यांनी केली आणि तो मिळत नसल्याचे सांगत मध्यरात्रीपर्यंत पाठपुरावा केला.

या दरम्यान राज्य यंत्रणेने सोमवारसाठी ४६ विशेष रेल्वेगाडय़ांची मागणी व तपशील दिला होता. पण त्यापैकी पाच गाडय़ा पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी असल्याने सध्याच्या चक्रीवादळाच्या परिस्थितीत जाऊ शकत नव्हत्या. तेथील राज्य सरकारी यंत्रणेने २६ मेपर्यंत श्रमिक गाडय़ा पाठवू नयेत, अशी सूचना केली असल्याने ४१ विशेष गाडय़ा रवाना केल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

या आधी रेल्वे प्रशासनास कोणत्या स्थानकापासून अन्य राज्यात कोठे गाडी सोडायची, याची माहिती आधी दिली जात होती आणि प्रवासाच्या दिवशी प्रवाशांची यादी दिली जात होती. आता त्यांनी या याद्या आधी मागितल्या असून त्या सादर करण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या उच्चपदस्थांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार, मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर विभाग आणि कोकण रेल्वेच्या माध्यमातून १ मेपासून राज्य सरकारच्या मागणीनुसार श्रमिक गाडय़ा सोडण्यात येत आहेत. रेल्वेने २३ मेपर्यंत ५२० श्रमिक गाडय़ांमधून सात लाख ३२ हजार १६६ स्थलांतरित मजूर, कामगारांना मूळ गावी पाठविण्यात आले आहे. या गाडय़ांचे नियोजन राज्य सरकारच्या यंत्रणेकडून संबंधित राज्यांच्या यंत्रणांशी चर्चा करून आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर निश्चित होते. रेल्वे व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने संपर्क व समन्वय सुरू आहे.

राज्य सरकारच्या यंत्रणेने पुरेशी तयारी न केल्याने रेल्वेने नियोजित केलेल्या ६५ गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, केरळ, राजस्थान या राज्यांची रेल्वेगाडय़ांना परवानगी देण्याची तयारी नव्हती. केरळने प्रवाशांच्या पुढील व्यवस्थेसाठी सर्व तपशील आधीच देण्याची विनंती केली होती. तर पश्चिम बंगालने अम्फान चक्रीवादळाने मोठे नुकसान झाल्याने २६ मेपर्यंत विशेष गाडय़ा न पाठविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या गाडय़ा रद्द कराव्या लागल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

तिरुनेलवेली, ऊना, रेवा, बिलासपूर येथे रवाना करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी होते. नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर व अकोला जिल्ह्य़ांमधून विशेष गाडय़ांसाठी फारशी मागणीही नसल्याचे दिसून येत आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेने राज्यातून १२५ गाडय़ा पाठविण्याचे नियोजन केले असून प्रवाशांच्या याद्या आणि अन्य तपशील आदींच्या पूर्ततेसाठी राज्य यंत्रणेशी समन्वय साधला जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

* राज्य यंत्रणेने सोमवारसाठी ४६ विशेष रेल्वेगाडय़ांची मागणी व तपशील दिला होता.

* पण त्यापैकी पाच गाडय़ा पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी असल्याने सध्याच्या चक्रीवादळाच्या परिस्थितीत जाऊ शकत नव्हत्या.

* तेथील राज्य सरकारी यंत्रणेने २६ मेपर्यंत श्रमिक गाडय़ा पाठवू नयेत, अशी सूचना केली असल्याने ४१ विशेष गाडय़ा रवाना केल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.