News Flash

कर्जमाफीतील घोळ दुरुस्ती

कर्जमाफीच्या प्रक्रियेत निर्माण झालेले तांत्रिक घोळ दुरुस्त करण्यास सुरुवात झाली

प्रातिनिधिक छायाचित्र

८९९ कोटींचा निधी वर्ग; दोन लाख शेतकऱ्यांची यादी बँकांकडे पाठविली

कर्जमाफीच्या प्रक्रियेत निर्माण झालेले तांत्रिक घोळ दुरुस्त करण्यास सुरुवात झाली असून, सुमारे दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी बँकांना शुक्रवारी रात्री पाठविण्यात आली. सुमारे ८९९ कोटींचा निधी बँकांना वर्ग करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

दिवाळीत कर्जमाफीस सुरुवात करण्यात आली, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आठ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीत अनेक तांत्रिक चुका आढळल्यावर ती यादी थांबविण्यात आली होती. चुकीच्या आधार क्रमांकासह अनेक बाबी उपस्थित झाल्याने माहिती-तंत्रज्ञान विभागाची धावपळ सुरू होती. विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल सुरू केला होता. अखेर काही अर्जामधील तांत्रिक चुका सुधारल्यानंतर दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार आयुक्तांमार्फत बँकांना पाठविण्यात आली. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या एक लाख एक हजार २०७ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यासाठी ६७१ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर प्रोत्साहन योजनेसाठी एक लाख ३८ हजार ४०३ शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.

खाती कमी कशी झाली?

राज्य बँकर्स समितीने ८९ लाख कर्जखात्यांची माहिती सरकारला दिली असताना ऑनलाइन अर्ज मागविल्याने ६७ लाख बँक खाती असल्याचे बँकांनी आता सरकारला कळविले आहे. जर सरकारने ऑनलाइन प्रक्रिया न करता बँकांच्या यादीनुसार पैसे दिले असते, तर करोडो रुपये वाया गेले असते, असे फडणवीस यांनी सांगितले. अनेक बँकांनी कर्ज खात्यांची संख्या कमी केली आहे. चुकीची कर्जखाती दाखविणाऱ्या बँकांवर कारवाईचा बडगा उचलण्यासाठी सरकार पावले टाकणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले.

यादीचा पेच कायम

उस्मानाबाद :  शासनाच्या संकेतस्थळावरून पहिली हिरवी यादी हटवून टाकण्याची नामुष्की ओढावल्यानंतर सरकारने आता सुधारित यादी संकेतस्थळावर जाहीर केली. या सुधारित यादीतही घोळ कायम असून, प्रमाणपत्र वाटप केलेल्या ‘त्या’ २३ लाभार्थ्यांची नावे त्यात नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कौतुक सोहळा आयोजित करुन केवळ प्रमाणपत्र हातात दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. उस्मानाबाद येथील कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, नेमकी त्याच २३ शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेल्या यादीत नसल्याचे उघडकीस आल्याने प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 4:21 am

Web Title: list of two lakh farmers sent to the banks says cm devendra fadnavis
Next Stories
1 धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण
2 मनसे कार्यकर्त्यावर मालाडमध्ये फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला
3 कुर्ल्यात गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी
Just Now!
X