09 April 2020

News Flash

पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची सक्ती

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्ती नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असले

| September 3, 2014 03:04 am

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्ती नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक जारी करून पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची बळजबरी मुंबई महापालिका शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना केली आहे. इतकेच नव्हे तर शाळांमध्ये टीव्ही आणि जनरेटर उपलब्ध करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षक संतप्त झाले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षकदिनी अनअध्ययन दिन साजरा करून घरी जाण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे.
५ सप्टेंबर रोजी देशभरातील १४ लाख शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आपले विचार ऐकविणार आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षक दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही शाळा लवकर सोडण्यात येतात. तर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. पालिका शाळांतील शिक्षक या दिवशी ‘अनअध्ययन दिन’ साजरा करतात. परंतु यंदा पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुपारी २ ते ४.३० या वेळेत हजर राहावे, असे परिपत्रक केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठविले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन महापालिकेनेही स्वतंत्र परिपत्रक जारी करून शिक्षक-विद्यार्थ्यांना या दिवशी शाळेत हजर राहण्याची सक्ती केली आहे. शाळेत टीव्ही नसेल तर तो उपलब्ध करावा. तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता असल्यास जनरेटर उपलब्ध करावा, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात शाळांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पंतप्रधानांचे भाषण काळजीपूर्वक ऐकावे आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांचे विचार विद्यार्थ्यांना समजवून द्यावेत, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
गणेशोत्सवानिमित्त सुट्टी असल्याने पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणायचे, टीव्ही आणि जनरेटरसाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षक कमालीचे संतप्त झाले आहेत.

पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात आली आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते आणि शिक्षक या दिवशी ‘अनअध्ययन दिन’ साजरा करतात. यंदाही ‘अनअध्ययन दिन’ साजरा करून शिक्षकांनी घरी निघून जावे. शिक्षकांवर कारवाई केली, तर ते सहन केले जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.    
– रमेश जोशी, सरचिटणीस, बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा

राज्य सरकारने पाठविलेल्या परिपत्रकाच्या आधारे पालिका शाळांतील मुख्याध्यापकांसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी सक्ती नसल्याचे केंद्राकडून कळविण्यात आल्याचे अद्याप समजले नाही. राज्य सरकारने तसे कळविल्यास काढलेले परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात येईल.    
– शांभवी जोगी, शिक्षणाधिकारी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2014 3:04 am

Web Title: listening to narendra modi teachers day address compulsory
टॅग Teachers Day
Next Stories
1 ..तर भारनियमन टळले असते!
2 मेगावाट! टाटाचा वीजसंच बिघडल्याने मुंबईकरांना भारनियमनाचे चटके
3 कोटय़वधी रुपयांच्या कर्ज वितरणात टक्केवारी?
Just Now!
X