पिंपरी येथे १५ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आजवर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निवडक अध्यक्षांची भाषणे, परिसंवादातील काही वक्त्यांची भाषणे, निमंत्रितांच्या कविसंमेलनात मान्यवर कवींनी सादर केलेल्या कविता असा आठवणींचा खजिना श्रोत्यांसाठी सादर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या २० केंद्रांवरून ‘खजिना साहित्य संमेलनातील आठवणींचा’ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार असून त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली. मुंबईसह राज्यातील अन्य केंद्रांवरून सकाळी ९ ते साडेदहा या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेत पु. ल. देशपांडे, शांता शेळके, ना. सं. इनामदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, द. मा. मिरासदार, वसंत कानेटकर, यशवंतराव चव्हाण यांची भाषणे ऐकता येणार आहेत. साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभागी झालेले विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे, प्रवीण दवणे आणि अन्य मान्यवर कवींनी सादर केलेल्या कविता ऐकविण्यात येणार आहेत. ‘सब घोडे बारा टक्के’ ही विंदांची गाजलेली कविता त्यांच्या आवाजात ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
‘विनोदी लेखन’ या विषयावरील एका परिसंवादात पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार यांच्यासह शांता शेळके सहभागी झाल्या होत्या. त्या परिसंवादातील या तिघांचे महत्त्वाचे मुद्दे ऐकविण्यात येणार आहेत.
आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर नगरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आठवणींचा हा खजिना श्रोत्यांसमोर सादर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literature gathering memories now on
First published on: 08-01-2016 at 01:24 IST