02 March 2021

News Flash

खाऊ खुशाल : चमचमीत दाबेली

गुजरातमधील मांडवी हे या कच्छी दाबेलीचं जन्मगाव.

प्रशांत ननावरे

मुंबईचा वडापाव आणि पाश्चात्त्य बर्गरमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून असलेला पदार्थ म्हणजे दाबेली. गुजरातमधील मांडवी हे या कच्छी दाबेलीचं जन्मगाव. पण गेल्या अर्धशतकाहून तो मुंबईचा मूलनिवासी असल्यासारखाच वावरतोय. मुंबईकरांना दाबेलीची फार पूर्वीपासून चटक लागलेली असली तरी मध्य रेल्वे मार्गावर तीन दशकांपूर्वी मुलुंडच्या पुढे कुणालाही दाबेली हा प्रकार म्हणजे काय याची साधी कल्पनादेखील नव्हती. तेव्हापासून म्हणजेच १९८८ सालापासून नरेश मजिठिया हे कल्याणच्या कल्याण-आग्रा रोडवर दाबेली विकतायत. सुरुवातीला छोटय़ा टेबलावर आणि नंतर हातगाडीवरील हा व्यवसाय हळूहळू कल्याणधीलच एका छोटय़ा दुकानात जाऊन स्थिरावला. पण दाबेलीला ब्रॅण्डचं स्वरूप दिलं नरेश यांच्या दोन मुलांनी. कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून आशीष आणि गौरव यांनी वर्षभरापूर्वी चर्नी रोड येथील हिंदुजा कॉलेजच्या गल्लीत ‘लिटल बाइट दाबेली’चं मुंबईतील पहिलं दुकान थाटलं. याच दुकानात त्यांनी सर्वप्रथम पंधरा प्रकारच्या दाबेली लोकांसमोर सादर केल्या.

बटर, शेझवान, मेयोनीज, चीज, बाऊल दाबेली, ग्रिल्ड, ग्रिल्ड शेझवान, ग्रिल्ड मेयोनीज, सँडविच दाबेली असे कधीही न ऐकलेले आणि खाल्लेले दाबेलीचे प्रकार येथे मिळतात. प्रत्येक दाबेलीची बनवण्याची पद्धत जवळपास सारखीच असली तरी त्यांना देण्यात आलेल्या ट्रीटमेंटमुळे त्यांची चव वेगळी लागते. आणि हेच इथल्या दाबेलीचं वैशिष्टय़ आहे.

सर्व दाबेलींपैकी ‘बाऊल दाबेली’ हा प्रकार अतिशय वेगळा असून तो तुम्हाला फक्त इथेच चाखायला मिळेल. यामध्ये सर्वप्रथम साध्या पावामध्ये दाबेलीचा मसाला भरून तो पाव ग्रिल केला जातो. ग्रिल झालेल्या दाबेली पावाचे नऊ  तुकडे करून ते एका बाऊलमध्ये घेतले जातात. त्यावर दाबेलीच्या मसाल्याची चटणी, शेंगदाणे, शेव आणि डाळिंबाचे दाणे टाकले जातात. चीज बाऊल दाबेली हवी असल्यास खूप सारं चीज वर किसून देण्यात येतं. हे सर्व कॉम्बिनेशन जबरदस्त चविष्ट लागतं. मुख्य म्हणजे केवळ पन्नास रुपयांमध्ये हे पोटभर जेवण केल्यासारखंच आहे. मसाला टोस्ट सँडविचप्रमाणेच बनवला जाणारा सँडविच दाबेली हा प्रकारही चांगला आहे.

दाबेलीचा मसाला दिवसातून दोन वेळा तयार होऊन थेट कल्याणवरून येतो. दाबेलीच्या बटाटय़ाच्या मसाल्यामध्ये मिक्स करावा लागणारा गरम मसाला पूर्वीपासून घरीच तयार केला जात असल्याने आज तीन दशकांनंतरही त्याची चव कायम असल्याचं गौरव सांगतात. एवढंच नव्हे तर दाबेलीमधील महत्त्वाचा घटक असेलल्या मसाला शेंगदाण्याचा मसालादेखील घरीच तयार केला जातो. बाजारातून केवळ खारे शेंगदाणे आणून दर आठवडय़ाला आवश्यकतेप्रमाणे मसाला शेंगदाणे बनवले जातात.

इथे जैन दाबेलीसुद्धा मिळते. जैन दाबेलीच्या मसाल्यासाठी बटाटय़ाचा वापर न करता कच्च्या केळ्यांचा वापर केला जातो. मेयोनीज आणि शेझवान चटणीमध्येदेखील जैन पर्याय उपलब्ध आहे. अनेकांच्या लक्षात येत नाही, पण वडापावचा पाव हा चौकोनी असतो आणि दाबेलीचा गोल. असाच मशीनद्वारे तयार केला जाणारा व जम्बो किंग आणि सिनेमागृहांमध्ये सप्लाय होणारा अतिशय चांगल्या दर्जाचा गोल पाव दाबेलीसाठी वापरला जातो. सध्या पंधरा प्रकारच्या दाबेली इथे मिळत असल्या तरी भविष्यात ही यादी वाढत जाणार आहे. कॉर्न, पनीर दाबेलीचे प्रकार आणि साध्या पावाऐवजी ब्राऊन ब्रेड, पनीनी ब्रेडचा वापर करून दाबेली बनवण्याचे प्रयोग सुरू असल्याचं गौरव सांगतात. नवीन प्रकार येतील तेव्हा येतील पण तोपर्यंत नव्यानेच दाखल झालेल्या कधीही न चाखलेल्या चमचमीत प्रकारांवर ताव मारायला काय हरकत आहे?

लिटल बाइट दाबेली

  • कुठे? – शॉप क्रमांक १ आणि २, आदिती रेस्टॉरंटच्या खाली, बेस्ट बस डेपो, मेकडॉनल्ड रेस्टॉरंटजवळ, अंधेरी रेल्वे स्थानकासमोर, अंधेरी (पश्चिम).
  • कधी? – सोमवार ते रविवार सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत.

@nprashant

nanawareprashant@gmail.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:46 am

Web Title: little bite dabeli andheri
Next Stories
1 खाद्यवारसा : उपवासाची दाण्याची आमटी
2 न्याहरीसाठी उत्तम पर्याय- हेल्दी स्मूदी
3 सॅलड सदाबहार : पनीर आणि पायनॅपल सलाड
Just Now!
X