गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणासाठी एसटी सोडताना प्रवाशाला थेट गावीच जाता यावे यासाठी जास्तीत जास्त ‘पॉईंट टू पॉईंट‘ सेवा देण्याचा विचार प्राथमिक स्तरावर के ला असून जवळपास तीन हजार बसगाडय़ा चालवण्याची तयारी असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

मंगळवारी परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या पुर्वतयारीचा आढावा, कामगारांचे वेतन इत्यादीसंदर्भात चर्चा झाली. कोकणात गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या तयारीचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. कोकणात गेल्यानंतर विलगीकरणाचा प्रश्न असून याबाबत शासन निर्णय घेणार आहे. या निर्णयानंतरच एसटी गाडय़ांच्या नियोजनाची माहिती प्रवाशांना देण्यात येईल, असे परब म्हणाले.

प्रासंगिक करारावर किंवा ग्रुप आरक्षणावर एसटी न चालवता मूळ भाडे आकारणीच होणार आहे. त्यामुळे कोणतीही भाडेवाढ होणार नाही. सध्या ४४ आसनी असलेल्या बसमधून २२ प्रवासी घेऊन जाण्याचा नियमच लागू असून तो गणेशोत्सवात कायम ठेवण्यासंदर्भात अंतिम निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रवाशांना कोकणात थेट आपल्या गावीच पोहोचता यावे म्हणून महामंडळाने जास्तीत जास्त ‘पॉईंट टू पॉईंट‘ सेवा चालवण्याचा विचार के ला आहे. त्यामुळे या गाडीतील प्रवासी तालुक्यातील आगार किंवा स्थानकात उतरुन अन्य वाहनाने आपल्या गावी जाण्याऐवजी एसटीतूनच थेट गावी पोहोचतील, हे त्यामागील उद्देश आहे.

एसटीसाठी आर्थिक मदतीची मागणी

उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबतही येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. मे महिन्यातील ५० टक्के वेतन बाकी असून जून महिन्यातील पूर्ण वेतनही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. वेतन प्रश्न मार्गी लावतानाच एसटीच्या अन्य दैनदिन खर्चासाठी एकूण ७०० ते ८०० कोटी रुपयांची गरज असून त्याची मागणी या बैठकीत केली जाणार असल्याचेही परब यांनी सांगितले. तसेच एसटीतून कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी केले नसून प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना स्थगिती दिल्याचेही ते म्हणाले.