06 August 2020

News Flash

आठ महिन्यांच्या बालिकेवर यकृत प्रत्यारोपण

अवघ्या पाच किलो वजनाच्या आठ महिन्यांच्या बालिकेवर परळ येथील ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

ग्लोबल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

अवघ्या पाच किलो वजनाच्या आठ महिन्यांच्या बालिकेवर परळ येथील ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे १० किलो वजनापर्यंतच्या बालकांवर प्रत्यारोपण केले जाते. इतक्या कमी वजनाच्या बालिकेवर प्रत्यारोपण करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

सुरतचे रहिवासी डॉ. कृणाल वळवी यांची कन्या इप्सा एक महिन्याची झाली तरी वजन वाढत नव्हते. दरम्यान तिची त्वचा पिवळी दिसायला लागली. स्थानिक डॉक्टरांनी तिला कावीळ असल्याचे सांगितले. तीन महिने पूर्ण झाले तरी वजन वाढत नसल्याने तिला बालरोगतज्ज्ञांकडे दाखविले. त्यावेळी तिला बायलिअरी अट्रेशिया (बीए) हा यकृताचा आजार असल्याचे निदान झाले.

निदान होईपर्यंत इप्साचा आजार वाढला होता. सर्वसाधारपणे ६० दिवसांच्या आत निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियेने हा आजार बरा करणे शक्य आहे. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण हा एकमेव उपाय उरला होता. इप्सा रुग्णालयात आली तेव्हा साडे चार महिन्यांची होती आणि तिचे वजन केवळ तीन किलोच होते. दहा किलो वजनाखालील बालकांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गुंतागुंतीचे असते. त्यामुळे तिचे वजन वाढेपर्यंत उपचार सुरू ठेवले. दरम्यान तिची प्रकृती बिघडत गेली. तिला वारंवार संसर्ग होऊ लागला. तेव्हा तातडीने प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे ग्लोबल रुग्णालयातील हेपॅटोलॉजिस्ट डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले.

इप्सावर जून २०१९ मध्ये शस्त्रक्रिया केली त्यावेळी तिचे वजन केवळ ४.७ किलो होते. इतक्या कमी वजनाच्या बालकामधील धमन्या, रक्तवाहिन्या यांची जोडणी करणे आणि रक्तप्रवाह पुन्हा सुरळीतपणे सुरू करणे आव्हानात्मक होते. या शस्त्रक्रियेसाठी तिला केवळ ३० मिलीलिटर म्हणजे दोन छोटे चमचे रक्त चढवावे लागले. तिची प्रकृती सुधारणेही आव्हान होते. इप्साला तिची २५ वर्षांची मावशी कृपालीच्या यकृताचा काही भाग बसविण्यात आला आहे. इप्सा आता अकरा महिन्यांची झाली असून तिचे वजनही सात किलोपर्यंत वाढल्याची माहिती यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अनुराग श्रीमल यांनी दिली.

‘कावीळकडे दुर्लक्ष करू नका!’

बीए हा दुर्मीळ आजार असला तरी त्याचे निदान उशिरा झाल्याने प्रत्यारोपणाची गरज भासणारी दरदिवशी जवळपास तीन ते चार बालके रुग्णालयात येतात. आजाराची लक्षणे कावीळसारखीच आहेत. त्वचा पिवळी पडणे, पांढरी विष्ठा, वजन न वाढणे ही त्याची लक्षणे आहेत. दोन आठवडय़ाहून अधिक काळ बालकांमधील कावीळ बरी होत नसल्यास तातडीने इतर चाचण्या करणे आवश्यक असल्याचे डॉ. बोरकर सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:37 am

Web Title: liver transplant surgery akp 94
Next Stories
1 ‘आरे वाचवा’साठी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर निदर्शने
2 धक्का लागल्याने सहप्रवासी महिलेला अमानुष मारहाण
3 इशारा अतिवृष्टीचा, प्रत्यक्षात पावसाची दडी..
Just Now!
X