News Flash

देवाणघेवाण पद्धतीने मुंबईत प्रत्यारोपण यशस्वी

यकृत दान करत ‘त्या’ महिलांनी एकमेकांच्या पतीचे प्राण वाचविले

(संग्रहित छायाचित्र)

बा.भ. बोरकर यांच्या ‘जीवन त्यांना कळले हो..’ या कवितेची प्रचीती कोल्हापूरचे शेतकरी बिकाराम (नाव बदलले आहे) आणि मुंबईतील डॉक्टर आतम (नाव बदलले आहे) यांच्या कुटुंबीयांना आली आहे.

यकृत निकामी झाल्याने प्रकृती गंभीर असलेल्या या दोन्ही व्यक्तींना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. परंतु दोघांच्याही थेट नातेवाईकांमध्ये एकही दाता जुळत नव्हता. अखेर देवाणघेवाण पद्धतीने दोघांच्याही पत्नीने स्वत:च्या यकृताचा काही भाग दान करत एकमेकांच्या पतीचे प्राण वाचविले आहेत. अशा रीतीने थेट नातलगांऐवजी देवाणघेवाणच्या माध्यमातून यकृत प्रत्यारोपण करण्याची ही मुंबईतील तिसरी घटना आहे.

मुंबईतील स्थायिक डॉ. आतम यांना यकृताचा कर्करोग झाला होता. प्रत्यारोपण एकच पर्याय राहिल्याचे रिलायन्स फाऊंडेशनमधील डॉक्टरांनी सुचविले. त्यांच्या पत्नीची यकृतदान करण्याची इच्छा असूनही जुळत नसल्याने प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते.

दरम्यान कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील छोटय़ाशा गावातील शेतकरी कुटुंबातील ३६ वर्षीय बिकाराम यांना प्रकृती गंभीर असल्याने रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल केले. त्यांचेही यकृत निकामी झाल्याने तातडीने प्रत्यारोपण करणे होते. परंतु त्यांच्याही पत्नी किंवा थेट नातेवाईकांचे रक्तगट, यकृताचा आकार या बाबी जुळत नसल्याने अगदी बिकाराम यांचे प्राण कसे वाचवावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला होता.

डॉ. आतम आणि बिकाराम यांच्यामध्ये देवाणघेवाण (स्व्ॉप) पद्धतीने प्रत्यारोपण होऊ शकते का हा पर्याय शोधला आणि आश्चर्य म्हणजे दोघांच्याही पत्नीच्या रक्तगटासह सर्व बाबी जुळून आल्या. परंतु त्यानंतर खरे कठीण काम होते ते म्हणजे एकाच वेळी चारही शस्त्रक्रिया करणे. ६ ऑगस्ट रोजी रुग्णालयात चार शस्त्रकिया एकाच वेळी करण्यात आल्या. बिकाराम यांच्या पत्नीच्या यकृताचा भाग डॉ. आतम यांना तर डॉक्टरांच्या पत्नीच्या यकृताचा काही भाग बिकाराम यांच्यामध्ये प्रत्यारोपित केला गेला. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून दोघांनाही घरीदेखील सोडण्यात आल्याचे डॉ. चेतन भट यांनी सांगितले. देवाणघेवाण पद्धतीने यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया तुलनेने अधिक गुंतागुंतीची असते. परंतु या पद्धतीने योग्य दात्यांची माहिती वेळेत प्राप्त झाली तर दोन जीवांचे प्राण वाचू शकतात. अधिकाधिक रुग्णांपर्यंत याचा फायदा पोहचविण्यासाठी दात्यांची माहितीचे योग्य रीतीने संकलन होणे आवश्यक असल्याचे मत ही शस्त्रक्रिया करणारे प्रसिद्ध यकृत सर्जन डॉ. ए.एस. सोईन यांनी मांडले.

मुंबईत यापूर्वी दोन वेळा असे प्रत्यारोपण केले आहे. याआधी आम्ही दिल्लीत ८६ रुग्णांमध्ये ४३ देवाणघेवाण पद्धतीने यकृत प्रत्यारोपण केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे यकृत अदलाबदलचा अल्गोरिदम तयार केला जात आहे. त्यामुळे रुग्णांशी जुळत्या दात्याचा शोध घेणे सोपे होऊन अधिकाधिक प्रत्यारोपण केले जाईल. तसेच विविध शहर, रुग्णालयांमध्येदेखील देवाणघेवाण पद्धतीने प्रत्यारोपण करता येईल का याचाही विचार केला जात आहे.

– डॉ. ए.एस. सोईन, प्रसिद्ध यकृत सर्जन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:41 am

Web Title: liver transplantation successful in mumbai abn 97
Next Stories
1 रक्तदानासाठी आता ओळखपत्र सादर करणे आवश्यक
2 शिवसेनेला जागावाटपाचा प्रस्तावच दिलेला नाही
3 ‘बेस्ट’ कामगारांचे बेमुदत उपोषण तूर्त स्थगित
Just Now!
X