28 February 2021

News Flash

‘बेस्ट’च्या वीज कामगारांचाही जीव धोक्यात

मीटर रीडिंग, वाहिन्यांसाठी खोदकाम तसेच बिघाड दुरुस्ती करताना सामाजिक अंतर पाळायचे कसे?

अवजड केबल उचलणे, ट्रान्सफॉर्मर उचलणे अशी कामे आजही बेस्टमध्ये पारंपरिक पद्धतीने केली जात आहेत. त्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात आहे.

मीटर रीडिंग, वाहिन्यांसाठी खोदकाम तसेच बिघाड दुरुस्ती करताना सामाजिक अंतर पाळायचे कसे?

मुंबई : मुंबईचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे काम करणाऱ्या ‘बेस्ट’च्या विद्युतपुरवठा विभागातील कामगारांना करोनाच्या काळात काम करताना मोठी कसरत करावी लागते आहे. दिवसभर मीटर रीडिंगसाठी गल्लीबोळात फिरणे, जमिनीखाली वाहिन्या टाकण्यासाठी कित्येक तास खोदकाम करणे, वीज वाहिन्यांतील बिघाड दुरुस्त

करणे अशी कामे करताना त्यांना सामाजिक अंतर पाळणे किंवा करोनाबाबतची काळजी घेणे केवळ अशक्य बनले आहे.

बेस्टमध्ये विद्युतपुरवठा विभाग चुनाभट्टीपासून कुलाबा, बॅकबेपर्यंत वीजपुरवठा करण्याचे काम करत आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून साधारण साडेपाच हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी किमान अडीच हजार कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करणारे कामगार आहेत. ह्यमध्ये मीटर वाचन, रस्त्यावर केबल टाकणारे, मीटर लावणारे, विजेचा बिघाड दुरुस्त करणारे यांचा समावेश आहे. करोनाचा हा काळ या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय कठीण बनला आहे.

बेस्ट प्रशासनाने विद्युत विभागातील सर्व कामगारांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्यात परिवहन विभागाच्या वाहक आणि चालकांप्रमाणे या कर्मचाऱ्यांना विश्रांतिगृह नाही. त्यामुळे सतत हात धुणे कामगारांना शक्य नसते. दिवसभर रस्त्यावर मास्क लावून अंग मेहनतीची कामे करणे हे या काळात खूपच त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया एका कामगाराने व्यक्त केली. विद्युत विभागातील कामगारांना एक दिवसाआड बोलावले तर कामगारांवरचा ताण हलका होईल, अशी मागणी कामगारांनी केली आहे. मीटर वाचनाचे काम करणाऱ्या कामगारांना रोज किमान चार ते पाच तास चालावे लागते. प्रतिबंधित विभागातून मीटर रीडिंगला बंदी असली तरी अन्य भागात धोका कमी नाही, अशी प्रतिक्रिया आणखी एकाने व्यक्त केली आहे. मीटरचे वाचन घेताना अनेकदा रहिवासी जमा होतात. जवळ येऊन बिलाबाबत चौकशा करतात. त्यांनी अनेकदा मास्क लावलेला नसतो, त्यामुळे धोका पत्करून कामगारांना काम करावे लागत आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे.

सुरक्षा साधने नाहीत

करोनापासून वाचवण्यासाठी कोणतीच सुरक्षिततेची साधने कामगारांना दिलेली नाहीत. तसेच ही उपकरणे घालून अंग मेहनतीची कामे करणे शक्य नसल्याचेही मत एका कामगाराने व्यक्त केले आहे. मास्क,पीपीई किट, फेस शिल्ड घालून काम करताना श्वास घेता येत नाही. त्यामुळे करोनाच्या काळात काम करणे या कामगारांना अत्यंत अवघड बनले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:31 am

Web Title: lives of best power workers are also in danger zws 70
Next Stories
1 ‘सहज बोलता बोलता’मध्ये आज सुबोध भावे
2 तिकीट खिडक्यांवर  नोटा निर्जंतुकीकरण यंत्र
3 टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन छायाचित्रणाला प्रतिसाद
Just Now!
X