‘गोल्डन जॅकल’ प्रजातीच्या दोन जखमी कोल्ह्य़ांना वर्सोवा आणि भांडुप येथून वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या मदतीने रविवारी ताब्यात घेतले. अशक्तपणा आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने दोन्ही कोल्हे या परिसरातील कांदळवन क्षेत्रानजीक पडून होते.

स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे या कोल्ह्य़ांना वाचविण्यात आले. यंदाच्या वर्षांत आत्तापर्यंत चार जखमी कोल्ह्य़ांचे जीव वाचविण्यात आले असून एका कोल्ह्य़ाचा रस्तेअपघात मृत्यू झाल्याची नोंद आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कांदळवनांमधून बाहेर पडत या कोल्ह्य़ांनी मानवी वसाहतीत शिरकाव केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर विक्रोळी परिसरात कोल्ह्य़ांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटनाही झाल्या आहेत. ‘रॉ’ या वन्यप्राणी बचाव संस्थेने २०१६ मध्ये १, २०१७ मध्ये २ आणि २०१८ मध्ये ४ जखमी कोल्ह्यांना भांडुप आणि पश्चिम उपनगरातील कांदळवन क्षेत्रामधून बचावले आहे.  वर्सोवा आणि भांडुप येथील कांदळवन क्षेत्रांमधून या दोन्ही कोल्ह्य़ांना रविवारी वाचविण्यात आले. वर्सोवा येथील स्थानिक नागरिक संजीव चोप्रा यांनी पोलिसांच्या मदतीने कोल्ह्य़ाचे प्राण बचावले. त्यानंतर कोल्ह्य़ाला ‘रॉ’च्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आले. तर भांडुप उद्दचन केंद्रानजीक पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या विशाल शहा यांना अशक्त कोल्हा आढळून आला. त्यांनी संस्थेशी संपर्क साधून कोल्ह्य़ांसंबंधी माहिती दिली.  वनविभागाच्या परवानगीनंतर दोन्ही कोल्ह्य़ांवर पशुवैद्यक डॉ. रीना देव उपचार करत असून वर्सोवा येथील कोल्ह्य़ांच्या पायाला अस्थिभंग झाल्याची माहिती ‘रॉ’चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.