क्रेडिट कार्डद्वारे काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी तगादा लावल्याने एका रिअल इस्टेट एजंटने दहिसरमध्ये आत्महत्या केली आहे. अमोल वैती असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड (एमएचबी) पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अमोल वैती हे दहिसर येथील कांदरपाडा परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यांनी विविध बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे कर्ज काढले होते. मात्र व्यवसायातील अडचणींमुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे झाले नाही. मात्र बँकांच्या पैसे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. तसेच वारंवार घरी येऊन घरातील सदस्य आणि मुलांसमोर पैसे भरण्यासाठी दबाव आणत असभ्य भाषेत वर्तन केले होते, असा आरोप अमोल यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत केला आहे. तसा संदेश त्यांनी नातेवाईकांना पाठविला होता. व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे काही वेळेला पैसे भरण्यासाठी उशीर झाला होता. मात्र विलंब शुल्कासह पैसे भरूनही बँक कर्मचाऱ्यांनी धमकी आणि त्रास देणे बंद केले नव्हते, असेही त्यांनी चिठ्ठीत म्हंटले आहे. त्यातूनच अमोल यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.

त्यांच्या पत्नीला सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गळफास लावलेल्या स्थितीत अमोल दिसून आले. शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी तत्काळ त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या त्रासातून जीवन संपवत आहे, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

याबाबत अमोल यांनी पाठविलेल्या संदेशातील गोष्टींची खातरजमा पोलिसांकडून केली जाईल. त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांनी दिली. याप्रकरणी एमएचबी पोलीस पुढील तपास करत आहेत.