शहरी अनुकरणामुळे मुख्य प्रवाहात येण्यासाठी आदिवासींची केविलवाणी धडपड

एकीकडे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात गणेशोत्सवाच्या सणासाठी लाखो करोडो रुपयांची उधळण होत असताना, या दोन्ही शहरांपासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या मुरबाडमधील आदिवासी पाडय़ांवर मात्र कर्ज काढून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या वाढत्या प्रस्थाचे गारुड आदिवासी समाजावरही पसरले असून, तथाकथित प्रतिष्ठेसाठी उसनवारी करीत आणि प्रसंगी स्वतकडील पशुसंपदा विकून हा सण साजरा करण्याची चढाओढ टोकावडे, खुटाल, दिवाणपाडा या परिसरातील कातकऱ्यांमध्ये लागली आहे.

गणपतीच्या पूजेसाठी लागणारी मोठी रक्कम हाती नसल्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्याच्या १५ दिवसांपूर्वी जुन्नरला किंवा कल्याणमध्ये वीटभट्टी मालकांकडून तब्बल १५ ते २० हजार रूपये कर्ज घेतले जाते. पुढे हे फेडण्यासाठी पुढील सात ते आठ माहिने दिवस रात्र वीटभट्टीवर राबावे लागत असल्याचे येथील कातकरी समाजाने सांगितले. माध्यमांमधून पसरलेले गणेशोत्सवाचे लोण आणि मुख्य प्रवाहात येण्याच्या अट्टाहासापायी आदिवासींमध्ये ऋण काढून सण साजरा करण्याचे प्रमाण गेल्या ४ ते ५ वर्षांपासून वाढले आहे. हक्काचे घर आणि हक्काची जमीनही नसलेल्या या समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी रानमेवा, सरपण गोळा करावे लागते नाहीतर वीटभट्टय़ांवर काम करुन उदरनिर्वाह करावे लागते. गणपतीचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका, पूजा, सजावट या खर्चासाठी कर्ज काढले जाते. काही घरांमध्ये उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेळ्यांसारख्या प्राण्यांनाही विकले जाते. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीचे वाहन उंदिर  घरातील अन्नधान्याची नासधूस करतील, असा समज असल्याने आदिवासी गणेशोत्सवात घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एकही व्यक्ती मजुरीसाठी घराबाहेर पडत नाही. मजुरीलाही रामराम ठोकल्याने दहा दिवसांच्या बेरोजगारीसोबत कर्जाचा डोंगरही डोक्यावर बसतो, असे या भागात काम करणाऱ्या श्रमिक मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते दशरथ वाघ यांनी सांगितले.

गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती

आदिवासींकडे दीड, अडीच, सात दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. वर्षभर यांच्याकडे कुठल्याही देवाची पूजा केली जात नाही. मात्र एका पाडय़ात एक सार्वजनिक गणपती बसविला जातो. मात्र यासाठी मंडप न बांधता कोणा एकाच्या घराच्या अंगणातच छोटय़ा आकाराची गणपतीची मूर्ती आणि काही ठिकाणी  घरगुती गणपती बसविले जातात. गणेशाच्या नवेद्यात रानभाज्यांबरोबरच पुरणाचे मोदक केले जातात.

मागास म्हणून शिक्का लागलेला आदिवासी समाज शहरी समाजाचे अनुकरण करत आहे. कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर प्रचंड प्रमाणात असलेल्या समाजाने गणेशोत्सवासाठी अशा प्रकारे खर्च करणे योग्य नाही. स्वत:ला मुख्य प्रवाहातील दाखविण्यासाठी आदिवासी समाजाची ही केविलवाणी धडपड आहे. इतके करूनही त्यांना कोणी मुख्य प्रवाहातील मानणार नाहीच, मात्र गणेशोत्सव यांना वेठबिगारी आणि बांधिलगडी बनवित आहे.

इंदवी तुळपुळे, श्रमिक मुक्ती संघटना

 

आमच्याकडे सात दिवसांचा गणपती असतो. जास्त पसे नव्हते, म्हणून आमच्या आठ बकऱ्या विकल्या आणि आलेल्या पशातून गणपतीची हौस केली. गोडाचा नवेद्य केला. गणपती घरी आल्यावर आम्हाला खर्च करावाच लागतो.

निवृत्ती पांडू वाघ, गावकरी (कातकरी समाज)