आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत जोरदार कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सरकारकडून फार अपेक्षा न ठेवता पक्षाची ताकद वाढविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक हरलेल्या भाजप उमेदवारांना केली. तर भाजपकडून लढल्याने निवडणूक हरल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून दाखल झालेले बबनराव पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यावर रावसाहेब दानवे यांनी ‘शत प्रतिशत’ भाजपचा नारा दिला होता. विधानसभेतील पराभूत उमेदवारांना उमेद देण्यासाठी आणि पक्ष कार्यात सक्रिय ठेवण्यासाठी भाजपने विधानभवनात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी पाच वर्षे काम सुरु ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. शिवसेनेशी युती तुटल्यानंतर निवडणुकीच्या तयारीसाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे स्वबळावर लढताना काही उमेदवारांना अतिशय कमी मतांनीही पराभव पत्करावा लागला. पण सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भाजपचे सरकार आले. पुढच्या निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली.
आर्थिक भार असून खर्चासाठीही कर्ज काढावे लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपले सरकार आले, आता सर्व कामे होतील, अशी अपेक्षा ठेवणे रास्त असले, तरी ते लगेच शक्य नाहीे, असे त्यांनी स्पष्ट केले.