एसटीकडून बेस्ट मार्गावरील उर्वरित २१० बसही माघारी;  लोकलमध्ये अद्याप अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच मुभा; बेस्टमध्ये उभ्याने प्रवासास मनाई

मुंबई : सरकारी व खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ, अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची असलेली मुभा यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात बेस्टच्या मदतीसाठी असलेल्या ऊर्वरित २१० एसटी बसही माघारी बोलावल्याने प्रवाशांच्या हालात आणखी भर पडली आहे. सोमवारपासून मुंबईतील अनेक बस थांब्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.

मुंबईमधील र्निबध अजूनही कायम आहेत. त्यामुळे मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा अद्यापही सामान्य प्रवाशांसाठी खुली झालेली नाही. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल असली तरीही काही प्रमाणात सामान्य प्रवासीही त्यातून जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु तिकीट तपासनीसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी अनेक जण हा प्रवास टाळत आहेत, तर बेस्ट बसमधून १०० टक्के  प्रवासी क्षमतेने वाहतुकीची परवानगी असून उभ्याने प्रवासी घेण्यास मनाई आहे. प्रवासी क्षमता काहीशी वाढल्याने अनेक जण बेस्ट प्रवासाकडे वळत आहेत. त्यामुळे बस थांब्यांवर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी लांबच लांब रांगा असतात. यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई असल्याने बस मिळण्यास प्रवाशांना बराच वेळ जात आहे. त्यामुळे घर ते कार्यालय किं वा स्थानक असा अर्धा ते एक तासाचा प्रवास त्याहीपेक्षा जास्त होत आहे. बसमध्ये आसन मिळत नसल्याने सुरुवातीच्या थांब्यापासून प्रवास करणारे प्रवासी सकाळी लवकरच येऊन रांगेत उभे राहत आहेत. याला पर्याय म्हणून रिक्षा, टॅक्सी किं वा खासगी वाहन घेऊन जाताना काही वेळेला मोठय़ा वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते.

त्यातच ऊर्वरित एसटी बसही एसटी महामंडळाने ताफ्यातून काढल्याने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली आहे. प्रवाशांची गैरसोय पाहता बेस्ट मार्गावर एसटी महामंडळाने एक हजार बसगाडय़ा चालवल्या. या बस मुंबईबाहेरून आणतानाच चालकही येत असे. परंतु मुंबईत काम करताना होणारी करोनाची लागण आणि गैरसोय पाहता एसटी कामगार संघटनांनी बेस्ट मार्गावरील एसटी गाडय़ा कमी करण्याची मागणी केली होती. नुकत्याच ५०० बस ताफ्यातून कमी के ल्या. त्यानंतर आणखी २९० बस काढल्या. आता रविवारी ऊर्वरित २१० बसही ताफ्यातून कमी करत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची मदार बेस्ट बसवरच आली आहे.

‘बेस्ट’कडे ३,३४४ बस

  • सध्या बेस्टच्या ताफ्यात ३ हजार ३४४ बसगाडय़ा आहेत.

यात मिडी ४६६ बस बेस्टच्या मालकीच्या असून १२५६ मिडी वातानुकू लित बस भाडेतत्त्वावरील आहेत.

  • या मिडी बसमध्ये आसनक्षमता कमी असल्याने प्रवाशांची सध्या गैरसोय होत आहे. त्यामुळे संपूर्ण मदार ४८ दुमजली बस, १,४५७ एकमजली बस तसेच सहा विजेवर धावणाऱ्या एकमजली बस आणि २५ हायब्रीड वातानुकू लित बसवरच आहे.
  • ४ जूनला १६ लाख आठ हजार प्रवासी बसमधून प्रवास करत होते. आता हीच प्रवासी संख्या १८ लाखांपर्यंत किं वा त्यापुढे जात आहे.

सर्वसामान्यांना लोकल बंद आणि एसटीनेही आपली सेवा खंडित केल्याने बेस्टच्या बसला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.