लोकलमधील विनयभंग प्रकरणानंतर उपाययोजना; रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती
तीन दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये गर्दुल्ल्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना झाली. या वेळी संकटकालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी डब्यात बसवण्यात आलेली साखळी ओढूनही केवळ ‘जलद’ लोकल असल्याने गाडी पुढच्या स्थानकावर न थांबल्याने रेल्वे प्रशासनावर टीका होत आहे. याच धर्तीवर जलद लोकलही पुढच्या स्थानकावर थांबवण्याचा विचार सुरू झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमधील महिलांच्या प्रथम श्रेणीतील डब्यातून एक महिला प्रवास करत होती. गाडी बोरिवली स्थानकात येताच एक गर्दुल्ला या डब्यात शिरला. त्याने या महिलेचा विनयभंग केला. गाडीतील काही महिलांनी साखळी ओढून गाडी कांदिवलीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी जलद असल्याने थेट अंधेरीला येऊन थांबली होती. याची दखल घेत जलद लोकलची साखळी ओढताच गाडी पुढच्या स्थानकांवर थांबवण्याचा विचार सुरू झाला असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
रेल्वेच्या नियमानुसार जलद लोकलची साखळी ओढली गेल्यास ती लोकल पूर्वनियोजित थांब्यावरच थांबवण्याचे आदेश मोटारमनला देण्यात आले आहे. मात्र विनयभंगाच्या प्रकरणानंतर जलद लोकलही पुढच्या स्थानकावर थांबवण्याचा विचार केला जात आहे. मात्र यात रोज किमान चार घटना विनाकारण साखळी ओढण्याच्याही नोंदवल्या जात असल्याने त्यावर अभ्यास करून काही दिवसांतच निर्णय घेणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.