जोगेश्वरी स्थानकाजवळ प्रसाधनगृहाची भिंत रुळावर

मुंबई : जोगेश्वरी स्थानकाजवळ पालिकेच्या हद्दीतील प्रसाधनगृहाच्या भिंतीचा काही भाग रुळावर पडला. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रेल्वेला कोणतीही कल्पना न देता प्रसाधनगृह पाडण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. मात्र या कामामुळे एखादा लोकल अपघात घडला असता, अशी भीती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची कामे घेताना रेल्वे प्रशासनाकडे ब्लॉकची मंजुरी घेणे आवश्यक असते, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हार्बरवरील जोगेश्वरी स्थानकाच्या फलाट क्रमांक एक जवळील संरक्षक भिंतीला लागूनच पालिकेचे जुने प्रसाधनगृह आहे. हे प्रसाधनगृह पाडण्याचे काम पालिकेच्या संबंधित विभागाकडून हाती घेण्यात आले होते. मात्र याची कोणतीही कल्पना पश्चिम रेल्वे प्रशासनाला देण्यात आली नव्हती. हे काम सुरू असतानाच प्रसाधनगृहाच्या भिंतीचा काही भाग रुळावर पडला. ही बाब समजताच तात्काळ याची माहिती जोगेश्वरी स्थानकातील स्टेशन मास्तरला दिली व त्याने नियंत्रण कक्षाला माहिती देऊन गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्या. त्यानंतर रुळावर पडलेले दगड, मातीचे ढिगारे उचलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम पंधरा ते वीस मिनिटांत पूर्ण करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.