खासदारांवर टीकेची झोड; लोकल प्रवाशांचा संताप
‘तुम्ही निवडून आलात, त्याला आता दोन वर्षे होत आली.. यादरम्यान तुम्हाला एकदाही रेल्वे प्रवाशांसोबत संवाद साधावासा वाटला नाही.. आज गर्दीमुळे प्रवासी लोकलमधून पडून मरत आहेत, उद्या दरवाजे बंद केले तर गुदमरून आमचा जीव जायचा.. आमच्यासारखा दररोज नाही, पण एकदा तरी लोकलने प्रवास करून पाहा.. अच्छे दिनांना भुलून तुम्हाला मतदान केल्याची लाज वाटते..’ या व अशांसारख्या अनेक संतप्त प्रतिक्रियांना शनिवारी कल्याण आणि भिवंडीच्या खासदारांना सामोरे जावे लागले.
कल्याण-डोंबिवली आणि दिवादरम्यान लोकल प्रवास करताना वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात कमी व्हावेत आणि प्रवाशांसोबत थेट संवाद साधता यावा यासाठी भिवंडी, कल्याणच्या खासदारांनी प्रवासी संघटनांसोबत शनिवारी आयोजित केलेली ही संवाद बैठक दिखाऊपणाचा नमुनाच ठरली. प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रियांना उत्तर देताना भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांना अक्षरश घाम फुटला. डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या या बैठकीस खासदार पाटील तब्बल दोन तास उशिराने अवतरले तेव्हाच प्रवाशांचा पारा चढला होता. सरसंचालक मोहन भागवत यांच्या नियोजित कार्यक्रमाचा दाखला देत ही बैठक अक्षरश गुंडाळली जाते आहे हे पाहून मग प्रवासीही संतापले आणि त्यांनी खासदारांच्या रेल्वेविषयक ज्ञानाची झडती घेण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी खासदारांना रेल्वे प्रवाशांच्या समस्या माहीत नाहीत, अशी तक्रार करताच िशदे आणि पाटील गडबडले. गेली दोन वर्षे खासदार प्रवासी संघटनांना भेटलेले नाहीत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यावर २३ डिसेंबरनंतर राज्य सरकारसोबत प्रवासी संघटनांची बैठक आयोजित करू, असे उत्तर देऊन दोन्ही खासदारांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
कसारा येथील विश्वनाथ धात्रक यांनी तर ‘मी भाजपला मतदान केल्याची लाज वाटते’ असे वक्तव्य केल्याने बैठकस्थानी खळबळ उडाली. ‘खासदार सर्वसामान्यांचे प्रश्नच समजून घेत नाहीत’, अशी टीका या वेळी काही प्रवाशांनी करताच खासदार पाटील यांनी ‘मी देखील शेतक ऱ्याचा मुलगा असून रेल्वे प्रवास आम्हीही केला आहे’, असे प्रत्युत्तर दिले. लोकलचा दरवाजा बंद असावा तसेच आसन व्यवस्थेमधील अंतर वाढवावे, अशा सूचना आम्ही रेल्वेमंत्र्यांना केल्या आहेत, असे खासदार पाटील यावेळी म्हणाले. त्यावर संतापलेल्या प्रवाशांनी ‘तुम्ही कशाच्या आधारावर बंद दरवाजाच्या गाडीची मागणी केली’, असा प्रतिसवाल केला. प्रवाशांचा रोष वाढतो आहे हे लक्षात येताच खासदारांनी चर्चासत्र गुंडाळले.