चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील एक आणि दोन क्रमांकाच्या मार्गावरील पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सोमवारी दुपारी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. हा बिघाड अवघ्या १५ मिनिटांत दुरूस्त झाल्याचा दावा पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी केला असला तरीही वास्तविक सव्वा तासाहून अधिक काळ चर्चगेटकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चर्चगेट आणि मरिन लाइन्स दरम्यान सांधे बदलण्याचा पॉइंट बिघडला. यामुळे चर्चगेटहून निघालेल्या दोन उपनगरी गाडय़ा मार्गातच उभ्या राहिल्या. चर्चगेटकडे येणाऱ्या गाडय़ांसाठी केवळ दोनच फलाट उपलब्ध होत असल्यामुळे गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या़