मस्जिद स्थानकाजवळील पादचारी पुलाच्या कामासाठी लवकरच ब्लॉक

मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकाजवळील सीएसएमटीच्या दिशेने असणाऱ्या ३० वर्षांपेक्षा जुन्या पादचारी पुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. हा पूल पाडून नवीन पुल उभारण्यात येणार असून त्याच्या किरकोळ काम २६ नोव्हेंबरपासून केले जाईल. नवीन पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम ६ डिसेंबरपूर्वी घेतले जाणार असून त्यासाठी सीएसएमटी ते भायखळापर्यंत अप व डाऊन धीमी लोकल सेवा बंद ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. गुरुवारी या पुलाची पाहणी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केली.

जुने व धोकादायक उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचा आढावा घेऊन ते पाडण्याचे तसेच नव्याने उभारण्याचे काम केले जात आहे. या कामासाठी ब्लॉकही घेण्यात येत असून त्यामुळे मध्य रेल्वेला काम करणे सोप्पे जात आहे. मध्य रेल्वेकडून कल्याण येथील पत्री पूलही ब्लॉक घेऊन यशस्वीरित्या पाडण्यात आला. तर यानंतर सॅन्डहर्स्ट रोडजवळील कर्नाक उड्डाणपुलाचाही आढावा घेतला. गुरुवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के.जैन यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मस्जिद रेल्वे स्थानकाजवळील (सीएसएमटीच्या दिशेने)३० वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या पादचारी पुलाची पाहणी केली. हा पूल जीर्णावस्थेत असून त्याचा  स्थानिक वापर करतात. त्यामुळे धोकादायक असलेला पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुल पाडून तो नव्याने बांधण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागेल. पुलाची किरकोळ कामे २६ नोव्हेंबरपासून हाती घेतली जातील. त्यासाठी मध्यरात्री दोन ते तीन तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. मात्र पूल पाडून त्यावर गर्डर टाकण्याचे महत्वाचे काम ६ डिसेंबरपूर्वी किंवा त्यानंतरच्या रविवारी घेण्यात येणार आहे. यासाठी जवळपास पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. हे काम करताना सीएसएमटीपासून ते सॅन्डहर्स्ट रोड स्थानकापर्यंत ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर गर्डर टाकण्याचे काम केले जाईल. यासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमध्ये सीएसएमटी ते भायखळय़ापर्यंत अप व डाऊन मार्गावरील धीमी लोकल सेवा बंद ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. तर सीएसएमटीपर्यंत फक्त जलद लोकल सेवा तेही विशेष लोकल चालविण्यासदंर्भात विचारही केला जात आहे. भायखळय़ापासून ठाणे, कल्याणच्या दिशेने लोकल सेवा मात्र सुरूच ठेवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या हार्बरवरील सीएसएमटी ते वडाळा लोकल गाडय़ांवरही ब्लॉकमुळे परिणाम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

योग्य नियोजनासाठी ब्लॉक

६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही  दिवस आधीच मोठय़ा संख्येने अनुयायी मुंबईत दाखल होतात. त्यामुळे लोकल गाडय़ांचा कोणताही गोंधळ होऊ नये, त्यादृष्टिनेच ब्लॉकचे नियोजन केले जात आहे.