दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याजवळील एका खांबाला बॅगा अडकून प्रवासी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी गाडीतून पडून दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाल्यावर स्थानिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र, मध्य रेल्वेने या घटनेची शहानिशा करून कारवाई करण्याचे ठरवले असून तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अप-डाउन धीम्या मार्गावर ताशी ५० किमीची वेगमर्यादा घालण्यात आली आहे.
कळवा-मुंब्रा यांदरम्यान धीम्या मार्गावर असलेल्या बोगद्यांपैकी एका बोगद्यातील खांब बदलण्यात आला असून नवा खांब रेल्वेमार्गाच्या जास्त जवळ आहे. त्यामुळे दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा अडकून ते प्रवासी खाली पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर दोनच दिवसांनी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी आणखी तीन प्रवासी येथे गाडीतून पडून मृत्युमुखी पडले.
रेल्वेने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. खांब बसवताना रेल्वेची नियमावली पाळली जाते. मात्र तरीही अशा घटना घडत असतील, तर त्याची चौकशी होईल, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.