मध्य रेल्वेमार्गावर इंजिनामध्ये बिघाड

सर्व रस्त्यांवरील कोंडीने मुंबईकरांचे हाल
चर्चगेटकडे येणाऱ्या जलद गाडीचे तब्बल सात डबे अंधेरी-विलेपार्ले या स्थानकांदरम्यान मंगळवारी रुळांवरून घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडली. या अपघातात एका महिलेसह पाचजण जखमी झाले. त्याच वेळी सकाळी मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी स्थानकाजवळ लांब पल्ल्याच्या गाडीच्या इंजिनाचा पेंटोग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचाही बोजवारा उडाला. याच दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेनेही अनेक वाहने निघाल्याने पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग आदी सर्वच मार्गावरही वाहतुकीचा ताण वाढला आणि मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गाडीचे दोन डबे रुळांवरून घसरल्यामुळे हार्बर वाहतूक कोलमडली होती. तसेच मध्य रेल्वे तसेच रस्त्यावरही गर्दीचा ओघ वळल्याने मुंबईकर व उपनगरीवासी हैराण झाले होतेच. त्यातून मुंबईकर सावरत नाहीत, तोच मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने येणारी जलद गाडी अंधेरी-विलेपार्ले यादरम्यान रुळांवरून घसरली. बारा डब्यांच्या या गाडीचे मागील सात डबे रुळांवरून खाली उतरले. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, डब्याच्या धडकेने ओव्हरहेड वायरचा खांब वाकडा झाला. काही डबे डाउन जलद मार्गावर आल्याने विरारकडे जाणारी जलद सेवाही खंडित झाली. अपघातामुळे दिवसभरात पश्चिम रेल्वेच्या २००हून जास्त सेवा रद्द झाल्या. तसेच विरार-बोरीवली येथून सुटणाऱ्या अनेक गाडय़ा अंधेरी स्थानकात रद्द करून मागे वळवल्या जात होत्या.
’मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अंधेरी येथे फलाटांवर प्रचंड गर्दी होती. फलाटावर उभे राहणे किंवा गाडीत शिरणेही शक्य नव्हते. वांद्रे स्थानकातही प्रचंड गर्दी होती.
’स्वामी विवेकानंद मार्गावरही वाहनांची गर्दी झाली होती. बोरिवली येथे जाण्यासाठी रिक्षा, बेस्ट व टॅक्सीकरता प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.
’चर्चगेट ते वांद्रे या प्रवासाला सुमारे सव्वा तास तर कांदिवलीपर्यंतच्या प्रवासाला दीड ते पावणेदोन तास इतका वेळ लागत होता.