01 November 2020

News Flash

मुंबईकरांसाठी एकच तिकीट! 

याबाबतची निर्णयप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणेच ही प्रक्रिया सुरू आहे.

लोकल, मेट्रो व बससाठी सुविधा

एकाच वेळी रेल्वे, बस, मेट्रो असे तीन तीन पास सांभाळून किंवा बसमध्ये चालकासह सुटय़ा पैशांची घासाघीस करून कंटाळलेल्या मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार लवकरच एकात्मिक तिकीटप्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीनुसार उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट आदी विविध वाहतुकीच्या साधनांसाठी एकच तिकीट प्रवाशांना बाळगता येणार आहे. याबाबतची निर्णयप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणेच ही प्रक्रिया सुरू आहे.

यापुढे कर्मचाऱ्याला तिकीट देण्याऐवजी तो कर्मचारी जेथे काम करतो त्या कंपनीला ते पास विकले जातील. प्रत्येक कर्मचाऱ्याला कुठूनही कुठेही प्रवास करण्याची मुभा असेल. त्यासाठी रेल्वेचे भाडे म्हणून ८०० ते १००० रुपये दरमहा घेतले जातील. तर बेस्ट, मेट्रो, मोनो, शेअर रिक्षा-टॅक्सी यांच्या खर्चासाठी १००० रुपये कर्मचाऱ्यांना पुरवले जातील. हे एक हजार रुपये त्या महिन्यात खर्च न झाल्यास पुढील महिन्यातही ते वापरता येतील, अशी योजना आकाराला येत असल्याचे ब्रिगेडियर सूद यांनी सांगितले. लोकांना मिळणारे कार्ड प्रवास सुरू करताना त्यांना एकदा स्वाइप करायचे आहे. तसेच प्रवास संपल्यानंतरही हे कार्ड स्वाइप करायचे आहे. प्रवासाचे अंतर आणि त्यासाठी आकारण्यात येणारे भाडे यांचा हिशेब करून त्या कार्डातून पैसे वजा होणार आहेत. यात रेल्वेने आपल्या एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के उत्पन्न म्हणजे ५० कोटी रुपये प्रतिमहिना देण्याची तयारी दर्शवल्याचेही सूद यांनी स्पष्ट केले.

केंद्राच्या निर्देशांप्रमाणे ही प्रणाली तयार होत आहे.सल्लागार नेमून पुढील निविदा प्रक्रिया सुरू  असल्याचे नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीर यांना सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना एकाच वेळी दोन-तीन मासिक पास, तिकिटांसाठी सुटे पैसे आदी गोष्टींच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी, तसेच वाहतुकीच्या साधनांमध्ये एकात्मता आणण्यासाठी एकात्मिक तिकीटप्रणाली सुरू करण्याचे प्रयत्न राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहेत. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

– ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 4:44 am

Web Title: local train metro bus now get one ticket in mumbai
टॅग Bus,Local Train,Metro
Next Stories
1 डान्सबारला परवानगी; मात्र कठोर र्निबध
2 ओव्हरहेड वायर तुटल्याने ‘परे’चा खोळंबा
3 न्यायालय डॉ. लहाने यांची बाजू ऐकणार
Just Now!
X