रोज लाखो मुंबईकरांना घेऊन गंतव्य स्थान गाठणाऱ्या उपनगरीय सेवेला मंगळवारी ९० वर्षे पूर्ण झाली. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिल्यांदाच विजेवर चालणारी उपनगरीय रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस (तेव्हाचे व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला या स्थानकांदरम्यान धावली होती.
राज्यकारभार करताना दळणवळणाचे महत्व लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेल्वेची निर्मिती केली आणि उपनगरीय लोकल सेवेलाही प्राधान्य देत नववनीन प्रयोग सुरू केले होते. रेल्वेत सुधारणा आणि प्रगती होत विजेवर चालणाऱ्या लोकल सेवेला प्रारंभ झाला आणि ९० वर्षांपूर्वी विजेवर चालणारी पहिली लोकल धावली.
१९२५ पर्यंत त्याला चार डबे होते. १९६१ साली ९ डब्यांची लोकल मेनलाइनवर सुरू झाली तर १९८६ मध्ये बारा डब्यांची लोकल सुरू झाली. सध्या दररोज १६१८ फेऱ्या होत असून सुमारे ४१ लाख प्रवासी प्रवास करतात.