कल्याणजवळ लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने कर्जत ते मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील सर्व लोकल, मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक विठ्ठलवाडीजवळ ठप्प झाल्या. त्याचा परिणाम ठाणे-कसारा दरम्यानच्या लोकल वाहतुकीवरही झाला. कल्याण, डोंबिवली आणि त्यापुढील रेल्वे स्थानके ही सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मुंबई परिसरात जाणाऱ्या नोकरदारांनी भरलेली असतात. कर्जतकडून येणाऱ्या लोकल स्थानकात येण्यास उशीर होऊ लागल्याने नोकरदारांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यानंतर पेंटोग्राफ तुटल्याचे ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आल्यानंतर प्रवाशांची चिडचिड झाली. उन्हाळ्यामुळे अंगातून घामाच्या धारा, त्यात गाडय़ांची शाश्वती नाही. कर्जतकडून आता एकही लोकल येणार नाही याची खात्री झाल्याने कल्याण, डोंबिवली यापुढील प्रवाशांनी कसारा, टिटवाळय़ाकडून येणाऱ्या तसेच कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या प्रवाशांना तुम्डुंब भरलेल्या लोकलमध्ये शिरावे लागले. लोंबकळत, लोकलच्या कपलिंगमध्ये बसून अनेकांनी प्रवास  केला.  
रिक्षांचा भाव तेजीत  
पेंटोग्राफ तुटल्याने कर्जत, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. अनेक प्रवाशांनी एसटी, परिवहन बस सुविधेचा वापर करून ठाणे, नवी मुंबईकडील आपला प्रवास सुरू केला. उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथील प्रवाशांनी रिक्षेने प्रवास करून थेट कल्याण रेल्वे स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. काहींनी परिवहन बस सेवेने ठाणे, नवी मुंबईकडील आपला प्रवास केला. या धांदलीमध्ये रिक्षाचालकांनी नेहमीच्या दरापेक्षा दहा ते वीस रुपये जादा आकारत असल्याचे चित्र दिसून आले. कल्याण रेल्वे स्थानकाजवळून नवी मुंबई, ठाण्याकडे जाणाऱ्या परिवहन सेवेच्या बस भरभरून जात होत्या. अनेक प्रवाशांनी आपली खासगी वाहने बाहेर काढून नोकरीच्या ठिकाणचा प्रवास सुरू केला होता. त्यामुळे काटई, कोन टोल नाक्यावरील गर्दीत नेहमीपेक्षा अधिक वाहनांची गर्दी वाढली होती.
लोकलच्या रांगा
कर्जतकडे जाणाऱ्या दोन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूपर्यंत लोकल, मेल, एक्सप्रेस गाडय़ांच्या जागोजागी रांगा लागल्या होत्या. या लोकलमधील  प्रवासी खाली उतरून पुन्हा परतीचा मार्ग धरत असल्याचे चित्र होते. विठ्ठलवाडी परिसरातील प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकात आल्याने सातही फलाट गर्दीने ओसंडून वाहत होते. कसाऱ्याकडून येणाऱ्या लोकलवर अनेकांची भिस्त होती. कल्याण लोकल गर्दीने तुडुंब ओसंडून रहात होत्या. रेल्वे स्थानकावर अर्धा ते एक तास थांबूनही कल्याण व डोंबिवली पुढील प्रवाशांना लोकलमध्ये चढणे जमत नव्हते. लोकलची प्रतिक्षा आणि प्रवाशांची घुसमट सुरू असतानाच दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुरूस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर अर्धा तासाने या मार्गावरील लोकल सेवा हळुहळु हलू लागली. सकाळी ढेपाळलेली लोकल वाहतूक दुपारनंतरही पंधरा ते वीस मिनीटे उशीराने धावत होती.