मध्य आणि हार्बर रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरुच असून मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. आज सकाळी ९.३० वाजता हा प्रकार घडला. आसनगाव ते खर्डी या स्थानकांदरम्यान असणाऱ्या आटगाव येथे रेल्वे रूळांना तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आसनगाववरून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

हार्बर रेल्वेवर मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला आणि ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. हार्बर रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा झाला असताना मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. आसनगावजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने डाऊन मार्गावरील सर्व लोकल ट्रेन्स आसनगावपर्यंतच चालवण्यात येत आहेत. गेल्या दीड तासांपासून रेल्वे प्रशासनाकडून रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या खोळंब्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

दरम्यान, लोकल गाड्यांचा वक्तशीरपणात सुधारणा झाला असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून केला जात असला तरी गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे. ऐन गर्दीच्या वेळी जलद लोकल गाड्यांचा पूर्णपणे बोजवाराच उडालेला असतो. मध्य रेल्वेला लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यात अपयशच येत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. २०१५-१६ मध्ये मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा ८५.९० टक्के होता. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ८७.३० टक्के तर आता ९० टक्क्यांपर्यंत वक्तशीरपणा असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून केला जात आहे.