सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे महिनाभराहून अधिक काळ जागीच असलेल्या लोकल गाडय़ा नादुरुस्त होऊ नये यासाठी प्रशासनाची बरीच धडपड सुरू आहे. गाडय़ांचा देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्याच्या चाचणीसाठी रेल्वे आठवडय़ातून एकदा लोकल थोडय़ाफार चालविल्या जातात.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसभरात एकू ण तीन हजारपेक्षा जास्त लोकल फे ऱ्या होतात. सध्या टाळेबंदीमुळे या गाडय़ा कारशेड, सायडिंग इत्यादी ठिकाणी उभ्या आहेत. एखादी दुचाकी, चारचाकीही तीन ते चार दिवस न चालवल्यास पुन्हा सुरू होताना बराच वेळ घेते. बस आणि रेल्वे ही मोठी वाहनांबाबतही तशी समस्या उद्भवू शकते.  म्हणून रेल्वे प्रशासन काळजी घेत आहे.

सध्या मध्य रेल्वेकडे १५५, तर पश्चिम रेल्वेकडे साधारण १०० लोकल आहे. याशिवाय दोन्हींकडे वातानुकू लित लोकलही आहे. मध्य रेल्वेने ८० लोकल सायडिंगला उभ्या केल्या असून ७५ लोकल कारशेडमध्ये आहेत.

या गाडय़ांचे पार्किंग ब्रेक, मोटार के बल इत्यादींची नियमित तपासणी के ली जात आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

लोकल सुरू राहावी यासाठी ती दोन स्थानकांदरम्यान चालवली जाते. त्या किमान ४०० ते ८०० मीटपर्यंत तरी चालविल्या जातात. हे काम आठवडय़ातून एकदा केले जाते. कारशेडमधील लोकलच्या  बाबतीत हे शक्य नाही. मग त्या जागीच पुढे-मागे चालविल्या जातात.  मेल-एक्स्प्रेस गाडय़ांबाबतही ही काळजी घेण्यात येते. हे उपाय पश्चिम रेल्वेकडूनही लोकल व एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी योजले जात आहेत.