गेल्या काही दिवसांपासून उपनगरीय प्रवासादरम्यान पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या कानांवर आदळणाऱ्या जाहिरातींमुळे प्रवासी संत्रस्त झाले आहेत. मात्र विविध उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार प्रवाशांवर करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला स्वत:च्याच प्रवासी उपयोगी प्रणालीची जाहिरात आणि प्रसिद्धी करण्याचा साक्षात्कार अद्याप झालेला नाही. रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या अशा मोबाइल तिकीट प्रणालीबाबत प्रवाशांना माहिती व्हावी, ही प्रणाली लोकप्रिय व्हावी, यासाठी रेल्वेने गेल्या सहा महिन्यांत काहीच योजना न आखल्याने अद्यापही मोबाइल तिकीट प्रणालीला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून दिवसाला फक्त १००० ते १२०० तिकिटे या कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीवरून काढली जातात. या दोन्ही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा आकडा नगण्य आहे.

मोबाइल तिकीट प्रणालीची सुरुवात

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या उपनगरीय भागांत मोबाइल तिकीट प्रणालीचे लोकार्पण केले होते. मात्र त्या वेळी मोबाइलवरून काढलेल्या तिकिटाची छापील प्रत घ्यावी लागत असल्याने प्रवाशांनी या सेवेकडे काणाडोळा केला होता. मात्र पश्चिम रेल्वेवर जुलै २०१५मध्ये आणि मध्य रेल्वेवर ऑक्टोबर २०१५मध्ये कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली सुरू करत रेल्वेने प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचा आपला मानस व्यक्त केला होता. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांदरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी ही सेवा लोकप्रिय करण्यासाठी रेल्वे विविध योजना आखणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पश्चिम रेल्वेवर कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली सुरू होऊन सहा महिने उलटले, तरी अद्याप प्रवाशांना या तिकीट प्रणालीची माहिती देणारी कोणतीही योजना रेल्वेने आखलेली नाही. मध्य रेल्वेवरही या प्रणालीला तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यपही मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत विचार केलेला नाही.

जाहिरातींचे झाले काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाइल तिकीट प्रणालीची माहिती देणारी आणि या नव्या प्रणालीचा प्रसार करणारी एक श्राव्य माध्यमातील
जाहिरात मध्य रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांनी तयार केली होती. त्यासाठी रेल्वेमध्ये नसलेल्या कलाकारांचीही मदत घेण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी खर्चात ही जाहिरात तयार केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मात्र, ही जाहिरात अद्याप एकदाही प्रवाशांच्या कानावर पडलेली नाही. त्याचप्रमाणे एटीव्हीएम किंवा स्मार्ट कार्ड योजनेबाबत रेल्वेने ज्या आक्रमकपणे प्रसार केला होता, ती आक्रमकता मोबाइल तिकीट प्रणालीबाबत दिसत नाही.

प्रणालीचे फायदे

या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रस्त्यावरून चालता चालता, स्थानकाकडे येताना प्रवास करताना, किंवा घरातून निघतानाही प्रवाशांना सहज तिकीट उपलब्ध होऊ शकते. ‘यूटीएस ऑन मोबाइल’ या अपवर प्रवाशांनी आपला मोबाइल क्रमांक नोंदवल्यावर एसएमएसद्वारे एक कोड नंबर येतो. हा कोड नंबर अत्यंत सोपा असल्याने तो लक्षात ठेवणेही कठीण नसते. या कोडच्या सहाय्याने प्रवासी लॉग इन करू शकतात. तसेच या अपवरील ‘आर वॉलेट’मध्ये पैसे भरण्यासाठी ऑनलाइन किंवा तिकीट खिडकी, असे दोन्ही पर्यायही रेल्वेने दिले आहेत. विशेष म्हणजे या अपच्या माध्यमातून मासिक किंवा त्रमासिक पासही काढता येतो.
अल्प प्रतिसाद का?
’ रेल्वेने मोबाइल तिकीट प्रणालीची प्रसिद्धी करण्याबाबत दाखवलेल्या उदासीनतेबरोबरच या प्रणालीमुळेही लोकांचा प्रतिसाद अल्प आहे. या प्रणालीच्या आरंभापासूनच एटीव्हीएम वा स्मार्टकार्डप्रमाणे येथेही प्रवाशांना पाच टक्के सवलत देण्याची मागणी होत होती. मात्र रेल्वे मंडळाने अद्यापही ही मागणी विचारात घेतलेली नाही. त्यामुळे प्रवासी पाच टक्के सवलत देणारे स्मार्ट कार्ड काढणेच पसंत करतात.
’ या प्रणालीवरून एका वेळी एकाच मार्गावरील मासिक वा त्रमासिक पास काढता येतो. त्यामुळे डोंबिवली-गोरेगाव असा पास काढणाऱ्यांना तो दादरमार्गे काढता येतो. पण डोंबिवली-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि बोरिवली-चर्चगेट असा पास काढणाऱ्यांना हे दोन्ही पास एकत्र काढता येत नाहीत.
’ अनेक ठिकाणी अजूनही जीपीएस यंत्रणेची समस्या असल्याने मोबाइल तिकीट निघणे कठीण जात असल्याच्याही तक्रारी आहेत. याबाबत सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम (क्रिस) काम करत असल्याचे क्रिसचे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.