टाळेबंदीमुळे रेल्वेच्या पावसाळापूर्व कामांना ब्रेक; नालेसफाई, रुळांची कामे थांबली

मुंबई : रेल्वे हद्दीतील पावसाळापूर्व कामांना टाळेबंदीमुळे ब्रेक बसला आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवर जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असते. परंतु ती यंदा मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. टाळेबंदी उठताच मर्यादित दिवसांत पावसाळापूर्व कामे पूर्ण करणे आणि लोकल वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पावसाळापूर्व कामांचे नियोजन हे पालिके च्या मदतीने हाती घेतले जाते. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार दरम्यान ५३, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ७९ छोटे-मोठे नाले आहेत. काही नाल्यांची सफाई पालिके च्या मदतीने करण्यात येते. याशिवाय ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी स्थानक, दादर, माटुंगा रोड ते माहीम, वांद्रे ते खार स्थानक, अंधेरी ते जोगेश्वरी, वसई ते विरार पट्टा आणि मस्जिद स्थानक ते दादर, माटुंगा ते घाटकोपर, मुलुंड ते कळवा, बदलापूर ते अंबरनाथ हे सखल भाग  आहेत. नालेसफाईबरोबरच या सखल भागातील रुळांची उंची वाढवणे, त्यासाठी रुळांखाली मोठय़ा प्रमाणात खडी टाकणे, स्लीपर्स बसवणे इत्यादी कामे पावसाळ्याच्या आधी के ली जातात. तसेच संपूर्ण मार्गावरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरची तांत्रिक कामे, रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, रुळांशेजारचा कचरा उचलणे इत्यादी कामे असतात. मार्चअखेरीस किं वा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कामांना सुरुवात होऊन ती जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चालतात.

१४ एप्रिलपासून सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे ती पूर्णपणे थांबलेली आहेत. या कामांसाठी रेल्वे कर्मचाऱ्याबरोबरच कं त्राटी कामगारही लागतात. मात्र करोनाच्या धास्तीने शहरातील मजूर वर्गाने मोठय़ा प्रमाणात शहराबाहेर स्थलांतर के ले आहे. त्यामुळे रेल्वेकडे ही कामे करण्यासाठी सध्या मनुष्यबळ नाही.

पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, हे कामगार टाळेबंदीनंतरही पुन्हा कधी येतील, हे सांगता येणे कठीण आहे, असे पश्चिम रेल्वेचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक गुरू प्रकाश यांनी सांगितले. मर्यादित कालावधीत ही कामे पूर्ण करावी लागतील, असे ते म्हणाले.

..अन्यथा सेवा ठप्प

गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि मुंबई ते पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्पच झाली, तर माथेरान मिनी ट्रेनचा मार्गही वाहून गेल्याने ही सेवाही बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पश्चिम रेल्वेलाही फटका बसला होता.