रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंबईची लाइफलाइन असणारी लोकलसेवा ठप्प झाली. दादर ते माटुंगादरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ३० लोकल रद्द कराव्या लागल्या. सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. यामध्ये मांडवी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेसचा समावेश आहे. या सर्व एक्स्प्रेस जवळपास तीन तास उशिराने धावणार आहेत. दरम्यान तब्ब्ल साडे तीन तासानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. रेल्वेकडून चर्चेचं आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले होते.

रेल रोकोचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या –
१. २० टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.
२. रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक भुमीपुत्रांना व इतर राज्यातील भुमीपुत्रांना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे.
३. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवेत समाविष्ट करणे आणि भविष्यातही नियम लागू ठेवावे.
४. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची वन टाइम सेटलमेंट एका महिन्याच्या आत रेल्वे सेवेत समाविष्ट झालेच पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे नियम अटी लागू करु नये.