करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंद असलेली लोकलसेवा अनलॉक प्रक्रियेनंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू असली तरी लोकलच्या फेऱ्या मात्र मर्यादीत होत्या. दरम्यान, या ट्रेनमध्ये होणारी गर्दी पाहत पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेनं २१ सप्टेंबरपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या ३५० फेऱ्या सुरू आहेत. परंतु आता त्या वाढवून ५०० इतक्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून रेल्वेच्या ५०० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गर्दीचं प्रमाणही थोडं कमी होण्यास मदत मिळणार असून अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

“२१ सप्टेंबरपासून सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या ३५० वरून ५०० करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालनं करावं आणि मास्क परिधान करावं,” असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.