राज्यातील अन्य भागांप्रमाणे मुंबईतही मागच्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील करोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईमधील या रुग्णवाढीसाठी लोकल सेवेकडे बोट दाखवले जात आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे सुद्धा असेच मत आहे. मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीमागे लोकल ट्रेन एक कारण असू शकते असे इक्बाल सिंह चहल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

“मुंबई लोकलमधून दिवसाला ५० लाख लोक प्रवास करतात. मागच्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून ते ३१ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती. एक फेब्रुवारीपासून आपण सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु केली.  लोकलमुळे करोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होतेय का? हे समजायला तीन आठवडे लागतील, असे त्यावेळी मी म्हटले होते. आत लोकल सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. करोनाकाळात मोठया प्रमाणात लोकल ट्रेनमधुन प्रवास सुरु आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा लोकलशी संबंध असू शकतो” असे इक्बाल सिंह चहल म्हणाले.

“आम्ही महत्त्वाच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांबरोबर बैठक केली आहे. कोविंड सेंटर आणि जम्बो फिल्ड हॉस्पिटल सक्रिय करत आहोत, असे चहल यांनी सांगितले. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस करोना रुग्ण संख्या वाढल्यानंतर मंगळवारी करोना रुग्ण संख्येत काहीशी घट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नागरिकांनी करोना रोखण्यासाठी सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउन करावे लागेल असा इशारा दिला आहे.