मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुरुषांना मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

 

करोना आणि लॉकडाउनमुळे मुंबई लोकल २२ मार्चपासून बंद होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश नव्हता. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत होते. रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे मुंबईत पोहचण्यासाठी तीन तासांचा अवधी लागत होता.मनसेसह इतरही पक्षांनी मुंबई लोकल सामान्यांसाठी खुली करावी अशी मागणी लावून धरली होती.

मुंबईसह एएमआर रिजनमधील महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार आहे. तसेच महिलांना प्रवास करताना क्यू आर कोडची आवश्यकता नसेल. सकाळी ११ नंतर महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. त्यामुळे चाकरमानी महिलांना याचा फारसा फायदा होणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी मर्यादित वेळेत का होईना पण लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला दुकाने, भाजी बाजार, चिकन-मटण शॉप सुरु करण्यात आले. त्यानंतर हॉटेल, रेस्तराँ आणि बार सुरु करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत. आता सिनेमागृहदेखील सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाही. महिलांना उद्यापासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे हीच त्यातली समाधानाची बाब आहे. असं असलं तरीही सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे.