प्रवाशांच्या उद्रेकाची वाट बघू नका; रेल्वे प्रवासी संघटनांची नाराजी

मुंबई : अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकल प्रवासाची दारे सामान्या प्रवाशांसाठी मात्र बंदच राहणार आहेत. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले आणि सामान्यांमध्ये नाराजी उमटली. लशीची मात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांना प्रवासाच्या परवानगीबाबतही निर्णय न झाल्याने प्रवाशांच्या उद्रेकाची प्रतीक्षा करू नका, असा इशाराच रेल्वे प्रवासी संघटनांनी दिला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे कामानिमित्त कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ,वसई-विरार व अन्य भागातून ठाणे, मुंबईपर्यंत प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तासन्तास प्रवास व खिशाला कात्री लागते. यातून सुटका व्हावी म्हणून लशीची एक मात्रा किं वा दोन मात्रा घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास करू देण्याची मागणी प्रवासी संघटनांनी राज्य सरकार व रेल्वे प्रशासनासमोर ठेवली. परंतु त्याचाही विचार राज्य सरकारकडून करण्यात आलेला नाही. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सामान्यांसाठी लोकल प्रवासाचा विचार गांर्भीयाने विचार करण्याची मागणी के ली. लस घेतलेल्यांना परवानगी देण्याबाबत विचार शासनाने के ला नाही. सध्याची परिस्थिती पाहता सामान्यांचा उद्रेक होऊ शकतो. तसे झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल याचाही विचार करण्याची गरज असल्याचे म्हणाल्या.

कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी नाराजी व्यक्त करत लशीची दोन मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी प्रवासी संघटनांची होती. परंतु हा निर्णय लांबणीवरच गेल्याचे दिसते. रस्ते प्रवासावर बराच खर्च होत असून तो सामान्यांना परवडणारा नाही, असे घनघाव यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेचे भय दाखवून सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासापासून दूर ठेवले जात आहे. त्यांच्याही मनाचा विचार सरकारने करावा. लोकल प्रवासासाठी योग्य नियोजन करावे. तसे न झाल्यास जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागू शकते.

– कैलास वर्मा, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ