21 November 2019

News Flash

गोरेगावात चिमुरडा नाल्यात पडला; पालिकेविरोधात स्थानिकांचा रास्तारोको

आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला.

गोरेगाव : आंबेडकनगर भागात एक तीन वर्षाचा चिमुकला गटारात पडला आणि वाहून गेला.

गोरेगावात आंबेडकर नगरमधील स्थानिकांनी रास्तारोको केल्याची घटना गुरूवारी दुपारी घटली. घराबाहेरील उघड्या नाल्यात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आज आंबेडकर नगरमध्ये येण्यापूर्वी येथील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. तसेच चिमुकला वाहून जाण्याच्या घटनेला मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली असून काल येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील नाला उघडा होता. त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, आपण त्या मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच जे अधिकारी या घटनेत दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो चुकून या उघड्या नाल्यात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरु केला. दरम्यान, गेल्या अनेक तासांपासून बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

First Published on July 11, 2019 1:15 pm

Web Title: locals protest 3 year old boy fell in gutter ambedkar nagar goregaon mumbai jud 87
Just Now!
X