|| प्रसाद रावकर

शिवाजी पार्कवर सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्पास स्थानिकांचा विरोध; धुळीचा मारा सुरूच

मुंबई : शिवाजी पार्क मैदानातून सतत उठणारे धुळीचे लोट बंद करण्यासाठी या मैदानावर हिरवा गालिचा निर्माण करण्याची महापालिकेची योजना आता पाण्यावाचून अडण्याची शक्यता आहे. हिरवळ निर्माण करण्यासाठी आवश्यक पाणीपुरवठा सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्प उभारून मिळवायचा पालिकेचा बेत आहे. याला पार्क परिसरातील रहिवाशांचा विरोध असून त्यांनी वर्षां जलसंचयाचा पर्याय पालिकेपुढे ठेवला आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा लांबणीवर गेली असून मैदानातील धुळीचा मारा सुरूच आहे.

सुमारे एक लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या मैदानावर गवताचा गालिचा निर्माण करण्यासाठी प्रतिदिन २.५० लाख लिटर पाण्याची गरज आहे. मैदानाच्या आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे येथील भूगर्भातील जलसाठय़ाची पातळी खालावल्याचे एका सर्वेक्षणातून उजेडात आले आहे. पिण्याचे पाणी याकरिता वापरण्याऐवजी पालिकेने मैदानात छोटेखानी सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्प उभारून पाणी उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून त्याचा रहिवाशांनाच नव्हे तर खेळण्यासाठी येणारी मुले, पर्यटकांनाही धोका निर्माण होण्याची भीती रहिवाशांना आहे. याला पर्याय म्हणून वर्षां संचयन प्रकल्पाद्वारे पाणी उपलब्ध करून घ्यावे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेल्या सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्पामधूनही मैदानात फवारणी करण्यासाठी पाणी उपलब्ध करून घेता येऊ शकेल, असा मुद्दा काही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया होईल आणि समुद्रातील प्रदूषणालाही आळा बसेल व मैदानासाठीही पाणी उपलब्ध होईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत रहिवाशांनी थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. मात्र अद्यापही कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे शिवाजी पार्कच्या आसपासच्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

गरज काय?

शिवाजी पार्कवर वांद्रे, परळ, दादरमधीलच नव्हे तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मोठय़ा संख्येने तरुण क्रिकेट खेळण्यासाठी, मल्लखांब, जिमनॅशिअमचे धडे गिरविण्यासाठी येतात. चौपाटी जवळ असल्यामुळे पर्यटकांना हे मैदान खुणावते. मोठय़ा संख्येने शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळास भेट देण्यासाठी येथे येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मैदानात निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते. एकूणच दररोज या मैदानात क्रीडापटू, पर्यटक आदींचा राबता असतो. त्यामुळे मैदान व आजूबाजूच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत असते. धुळीच्या त्रासामुळे मैदानाच्या सभोवताली राहणारे रहिवाशी प्रचंड हैराण झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण मैदानात गवताचा हिरवा गालिचा निर्माण करून हा प्रश्न कायमचा मिटविण्याची योजना पालिकेने आखली आहे.

‘वर्षां जलसंचय उत्तम पर्याय’

‘पावसाचे स्वच्छ पाणी गटारात वाहून जाते. हेच पाणी अडवून जमिनीत जिरवले, तर जमिनीतील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होईल. तसेच वर्षां संचयन प्रकल्पाच्या माध्यमातून मैदानासाठी वापरता येईल. हा पर्याय पर्यावरणस्नेही ठरेल,’ असे मत पर्यावरणप्रेमी डॉ. सीमा खोत यांनी व्यक्त केले. ‘सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्प चालविण्यासाठी विजेची गरज लागेल. हा पर्याय खर्चीक ठरेल. प्रकल्पातील यंत्रणेत बिघाड झाल्यास दुर्गंधीचा त्रास होईल. मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही भेडसावेल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी पार्कच्या आसपास भूगर्भातील पाण्याचे साठे आटले आहेत. मैदानासाठी लागणारे केवळ एकपंचमांश पाणी भूगर्भातून मिळू शकेल. वांद्रे येथील ‘आय लव्ह मुंबई’ उद्यानातील वृक्षवल्लींसाठी सांडपाणी प्रनप्र्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यात येत आहे. तेथे यशस्वीरीत्या या पाण्याचा वापर होत आहे. पिण्याच्या पाण्याचा वा भूगर्भातील साठय़ांचे नुकसान करण्याऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेल्या सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर मैदानासाठी योग्य ठरू शकेल.

– अशोक दातार, पर्यावरणप्रेमी