राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर मुंबईसह काही भागांत करोनाची रुग्णसंख्या घटली. मात्र, अद्यापही राज्यात ६० हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्णवाढ होत असल्याने टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे सध्याचे निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवले जाण्याची शक्यता असून, निश्चित कालावधी आणि निर्बंधांतील सवलतींबाबत शुक्रवारी नवा आदेश काढण्यात येणार आहे.

टाळेबंदीमुळे गर्दीवर नियंत्रण आले. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली. मात्र, त्यात अपेक्षेप्रमाणे घट झालेली नाही. अशा परिस्थितीत टाळेबंदी उठवली तर पुन्हा गर्दी वाढून रुग्णसंख्येचा आलेख वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात यावा, असा सूर मंत्रिमंडळ बैठकीत उमटला. त्यानुसार १५ मेपर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा विचार पुढे आला. मात्र, याबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

१ मेनंतरही टाळेबंदी कायम राहील. पण ही टाळेबंदी १५ मेपर्यंत करायची की कालावधी थोडा कमी ठेवायचा यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात २४ तासांत ९८५ करोनाबळी

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांंत करोनाचे ६३,३०९ रुग्ण आढळले, तर ९८५ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील दैनंदिन करोनाबळींचा हा उच्चांक आहे. मुंबई-ठाणे २२०, नाशिक विभाग १३७, पुणे विभाग २१७, मराठवाडा १८९, विदर्भात १७५ मृत्यू झाले आहेत. पुणे शहरात ११७ मृतांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रदिन साधेपणाने…

सध्याच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर १ मे रोजीचा महाराष्ट्रदिन साधेपणाने साजरा करावा, कवायती किंवा संचलन आयोजित करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य सरकारने बुधवारी रात्री काढले. महाराष्ट्रदिनी जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी कमी उपस्थितीत ध्वजारोहण करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

काही मंत्र्यांचा विरोध…  सध्या लागू असलेली टाळेबंदी वाढवावी, असे बहुतेक मंत्र्यांचे मत होते. मात्र, सुनील केदार आणि आस्लम शेख या काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी टाळेबंदी वाढविण्यास विरोध केल्याचे समजते. टाळेबंदी वाढविल्याने अर्थचक्र  ठप्प होते आणि त्याचा ग्रामीण भागावर विपरीत परिणाम होतो, याकडे केदार यांनी लक्ष वेधले. सर्वच व्यवहार बंद ठेवू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.