वसईतील कार्यशाळा बंद असल्याने लोखंडी सांगाडय़ाच्या जोडणीची प्रतीक्षा

मुंबई : नागरिकांच्या उद्रेकानंतर अंशत: सुरू करण्यात आलेल्या चर्नी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील (पूर्व) पादचारी पुलाच्या उर्वरित बांधकामाला टाळेबंदीचा फटका बसला आहे. या पुलाच्या लोखंडी सांगाडय़ाच्या जोडणीचे काम सुरू असलेली वसईतील कार्यशाळा टाळेबंदीमुळे बंद आहे, तर कामगारांनीही गावची वाट धरली आहे. परिणामी या पुलाचे उर्वरित बांधकाम रखडले आहे. परिणामी पूल पूर्णत: सुरू होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

चर्नी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पूल धोकादायक बनल्यामुळे त्याची दुरुस्ती वा पुनर्बाधणी करण्याची मागणी करण्यात येत होती. ठाकूरद्वार नाक्यावरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या बाबासाहेब जयकर मार्गावर उतरणाऱ्या या पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग १४ ऑक्टोबर २०१७ रोजी कोसळला आणि त्यानंतर हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना महर्षी कर्वे मार्ग ओलांडून रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. कार्यालयात जाण्या-येण्याच्या वेळेत या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून त्याच वेळी या मार्गावर वाहनांचीही प्रचंड वर्दळ सुरू असते. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत होते.

पालिकेने पुलाच्या पुनर्बाधणीचा निर्णय घेतला आणि त्याचा आराखडाही तयार केला. मात्र पुलाखालून जाणाऱ्या रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या वाहिन्यांमुळे पुलाच्या बांधकामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहिन्या हलविण्यात आल्यानंतर पुलाचे बांधकाम सुरू झाले. मात्र अत्यंत संथगतीने काम सुरू असल्याने तीन वर्षे लोटली तरी पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही.

पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही गिरगावकर संस्था, शिवसेना आणि भाजपने अनेक वेळा आंदोलन केले. त्यामुळे या पुलाच्या एका बाजूचे काम पूर्ण करून तो अंशत: सुरू करण्यात आला. असे असले तरीही निम्म्याहून अधिक पुलाचे बांधकाम रखडले आहे. करोना संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीपूर्वीच पुलाच्या खांबांचे काम पूर्ण झाले आहे. या खांबांवर लोखंडी सांगाडा उभा करून पूल पूर्ण करण्यात येणार आहे. काही लोखंडी सांगाडे चर्नी रोड स्थानकाबाहेर रस्त्यावर ठेवण्यात आले आहेत. मात्र कामगार नसल्यामुळे ते नियोजितस्थळी बसविता आलेले नाहीत. तर उर्वरित सांगाडय़ांच्या जोडणीचे काम वसई येथील कार्यशाळेत सुरू होते. टाळेबंदीमुळे ही कार्यशाळा बंद आहे. त्यामुळे कामगार गावी निघून गेले आहेत. संबंधित जिल्ह्य़ाधिकाऱ्यांनी कार्यशाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आणि गावी गेलेले कामगार परतल्यानंतर सांगाडय़ाच्या जोडणीचे काम होऊ शकेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.