दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार परवडत नसल्याने निर्णय; अनेक व्यापाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ

अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रातील अर्थचक्र थंडावले असून सर्वाधिक फटका छोटय़ा व्यापाऱ्यांना आणि नवोदित व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. अनेकांवर व्यवसाय गुंडाळण्याची वेळ आली आहे. तर काहींनी सध्याचे व्यवसाय बदलून टाळेबंदीत टिकेल असे व्यवसाय पोटापाण्यासाठी शोधले आहेत. काहींनी तर कपडय़ांच्या दुकानात किराणा वस्तू विकण्यास सुरुवात केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने टाळेबंदीत गेले तीन महिने सर्व दुकाने बंद होती. तर मागील महिनाभरापासून दुकाने सुरू  करण्याची परवानगी मिळाली असली तरी ती दिवसाआड उघडण्याचे बंधन आहे. वाहतूक निर्बंध, संचारबंदीमुळे बाजारपेठा आणि कार्यालयांबाहेरील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत नाही. सर्वसामान्यांच्या खर्च करण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे दुकाने उघडली असली तरी ग्राहकांविना ती ओस आहेत. दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार आदींसाठी व्यावसायिकांना दरमहा मोठी रक्कम खर्च करावी लागते. त्यामुळे अनेकांनी व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेतला.

प्रतीक आंब्रे यांनी मित्राच्या सोबतीने लोअर परळ येथील कॉर्पोरेट कार्यालयांच्या परिसरात दहा महिन्यांपूर्वी चहाचे दुकान सुरू केले होते. लोअर परळ भागातील उच्चभ्रू कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर्जेदार चहाचा पुरवठा करून स्वत:चा ब्रॅंड उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र चार महिन्यांपासून दुकान बंद आहे. मात्र दुकान भाडे भरावे लागत असल्याने त्यांना नुकसानीला समोरे जावे लागले. ‘सध्या दुकान सुरू केले तरी कार्यालयांत कर्मचारी नाहीत. त्यामुळे ग्राहक मिळणे अवघड आहे. करोनाचा प्रादुर्भाव संपून सर्व सुरळीत होण्यास किती कालावधी जाईल हे माहीत नाही. तसेच तोपर्यंत दुकान भाडे भरणे परवडणारे नाही. त्यामुळे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला,’ असे प्रतीक सांगतात. हीच व्यथा दादर येथील बॅगचे होलसेल विक्रेते तौफिक शेख व्यक्त करतात. होलसेल व्यापाराबरोबरच किरकोळ स्वरूपातील बॅगच्या विक्रीसाठी त्यांनी दादर परिसरात ‘वर्थ इट’ हे दुकान सुरू केले होते. मात्र टाळेबंदीतही दरमहा ७५ हजार रुपये भाडे भरणे परवडणारे नसल्याने त्यांनी हे दुकान बंद केले. बॅग विक्रीचा ‘सीझन’ टाळेबंदीतच निघून गेला. सध्या दुकान उघडूनही बिलकुल मागणी नाही, असे शेख सांगतात.

दादर येथे मनीष पराडकर यांचे जान्हवी कलेक्शन हे बॅगचे दुकान आहे. मात्र नागरिक घराबाहेरच पडत नसल्याने विक्री नसल्याचे ते सांगतात. मात्र कामगारांचा पगार आणि कु टुंबाचा थोडा फार उदरनिर्वाह चालावा यासाठी बॅगेबरोबरच महिलांसाठीचे कपडे विक्री करण्यास सुरुवात केल्याचे ते सांगतात.

कपडय़ांच्या दुकानात किराणा

विरेन शहा यांचे कॉफर्ड मार्केट परिसरात ‘रुपम’ हे बहुमजली दुकान आहे. ‘या दुकानात कपडय़ांचे विविध प्रकार त्यामध्ये साडी, उबदार कपडे, लग्न समारंभाचे विशेष पोशाख, लहान मुलांचे कपडे यांचा समावेश होता. मात्र सध्या त्यांना मागणीच नाही. त्यामुळे या परिस्थितीत साडी, लग्न समारंभाचे पोषाख आणि उबदार कपडय़ांचा विभाग पूर्ण बंद ठेवला आहे. मात्र घरगुती वापराच्या वस्तूंना मागणी असल्याने इमारतीचे तीन मजले किराणा दुकानात बदलले आहेत. त्यामध्ये घरगुती वस्तू, किराणा, करोना संबंधित वस्तू आदी सामान ठेवले आहे,’ अशी माहिती विरेन शहा देतात.