विरार : संचारबंदीच्या काळात मद्यविक्री बंद कऱण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीनं मद्याची विक्री दामदुप्पट दरानं विक्री सुरू आहे. संचारबंदी काळात मद्यविक्री बंद असली तरी एका बारमालकानं शक्कल लढवत इन्स्टाग्रामवरून मद्य विक्री सुरू केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली.

वसईतील ओशियन बारचा मालक संतोष महंती (२९) याने थेट घरपोच मद्यविक्री करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. यासाठी त्याने लोकप्रिय असेलल्या इन्स्टाग्राम समाजमाध्यमाचा आधार घेतला. त्याने इन्स्टाग्राम वर ‘द लिकर मॅन’ या नावाने खाते उघडून सर्रास दारू विक्री चालवली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मार्फत सापळा रचून त्यास अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून विदेशी मद्यासह सव्वालाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय साथरोग अधिनियम १८९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

मद्यपींनी देशी दारूची दुकानं फोडली –

व्यसन माणसाला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हटलं जातं. हे एका अर्थान खरं असल्याची प्रचिती सांगली जिल्ह्यात घडलेल्या दोन घडनांमधून येतं आहे. देशात आणि राज्यात लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद आहे. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या तळीरामांची सध्या घालमेल सुरू आहे. शोध घेऊनही कुठेच दारू मिळत नसल्यानं काही तळीरामांनी चक्क देशी दारुचं दुकानं फोडली. सांगली आणि मिरज शहरात या घटना घडल्या आहेत.