News Flash

“फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”, नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा!

भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे.

राज्यात वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू केला. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाने लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. ५९ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे राज्य सरकारचं पाप आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पाप आहे. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे आणि मृतांचे आकडे जाहीर करतात. हे नाही-ते नाही सांगतात. जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना?” अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?

लॉकडाऊनसंदर्भात बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकंच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?” असं राणे म्हणाले.

पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन -संजय राऊत

“मुख्यमंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची आहे का?”

“काय करतात मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून? एक-दोन दिवसांत मुंबईत हॉस्पिटल उभं करू शकत नाही? मुंबईत हवं ते करू शकतो माणूस. फक्त मृतांची संख्या, बाधितांची संख्या जाहीर करायची. हे कमी-ते कमी असं मुख्यमंत्री जाहीर करतात. जनाची नाही, मनाची तरी आहे का? कमी असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री असतो. नुसतं खुर्चीवर बसून चालत नाही. याला कर्तृत्व लागतं. मुख्यमंत्री मास्क लावा, हे करा, ते करा असं सांगतात का? दीड हजार देतो हे सांगतायत. एखाद्या क्लर्क किंवा अधिकाऱ्याला सांगा जाहीर करायला. राज्य आर्थिक संकटात टाकायचं काम सुरू आहे”, असं देखील नारायण राणे म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्री वारंवार धमकी देत होते”

“मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून मृतांची संख्या वाढतेय. राज्यात ५९ हजार रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. हे पाप राज्य सरकारचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. उपाय म्हणून मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याची वारंवार धमकी देत होते. जणू महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतलंय. दम देण्याचं काम राज्य सरकार करत होतं. शेवटी त्यांनी लॉकडाऊन लागू केला. रिक्षावाल्यांना १५०० देणार. पण ५ माणसांचं कुटुंब १५०० रुपयांमध्ये उपजीविका करू शकणार आहे का?”, अशा शब्दांत राणेंनी निशाणा साधला.

“अजून किती सचिन वाझे आहेत ते बाहेर येईल”

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला. “सचिन वाझे प्रकरण एक आहे. पण नजरेसमोर आलेले अजून किती सचिन वाझे आहेत जे यांच्या आदेशांनुसार चालत आहेत. यांना नको असलेली माणसं सचिन वाझेंसारख्या लोकांकडून मारण्याचं काम अजूनही सुरू आहे. एनआयएच्या चौकशीतून अजून बाहेर येईल. वाझे कुणाच्या सांगण्यावरून कुणाकुणाची अजून हत्या करणार होते ते बाहेर येईल. भयावह चालू आहे. हे लोकशाहीतलं राज्य नसून ही हुकूमशाही सुरू आहे. फक्त पैसा कमावण्यासाठी एककलमी कार्यक्रम चालू आहे”, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:22 pm

Web Title: lockdown in maharashtra bjp narayan rane slams cm uddhav thackeray pmw 88
Next Stories
1 बांधकाम क्षेत्राला उभारी
2 मागेल त्याला रेल्वेतिकीट
3 रुग्णवाहिकांसाठी प्रतीक्षा
Just Now!
X